Ashadhi Ekadashi 2021: आषाढी एकादशीनिमित्त यंदाही राज्यातील 10 मानाच्या पालख्यांचा होणार एसटी बसमधून प्रवास, 19 जुलैला प्रस्थान- मंत्री अनिल परब

वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. हे संकट पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील 10 मानाच्या पालख्यांसाठी एसटीची 'लालपरी' धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

आषाढी एकादशी वारी | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आषाढी एकदशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. यंदा 20 जुलै रोजी आषाढी एकादशीचा उत्सव साजरा होणार आहे. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. हे संकट पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील 10 मानाच्या पालख्यांसाठी एसटीची 'लालपरी' धावणार आहे, अशी  माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

मागील वर्षाप्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटीला मिळाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्यातील 10 मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 19 जुलै रोजी या बस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील  संस्थांना, विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावे, अशा सूचनाही श्री.परब यांनी दिल्या. या पालख्यांचा प्रवास मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरी पर्यंत एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील. (हेही वाचा: जयंत पाटील कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या भेटीस; Almatti Dam पाण्यासह, सांगली कोल्हापूर महापूरावर चर्चा)

वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व बसेस निर्जंतुकीकरण करण्यात येतील. तसेच प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही श्री.परब यांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement