कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी राज्यात 22,118 खोल्यांची सज्जता, तर 55,707 खाटांची सोय- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती
नुकतेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 649 झाली आहे. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे
सध्या कोरोना व्हायरसची (Coronavirus) सामना करण्यासाठी संपूर्ण देश झटत आहे. नुकतेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 649 झाली आहे. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने संक्रमित अशा रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र शासन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी बराच प्रयत्न करत आहे. अशात कोरोना नियंत्रणासाठी राज्यात 22,118 खोल्यांची सज्जता झाली असून, 55,707 खाटांची सोय करण्यात आल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस विरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात 22 हजार 118 खोल्यांची सज्जता करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी 55 हजार 707 खाटांची सोय होऊ शकेल, यामध्ये विश्रामगृहे, वसतिगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारतींचा समावेश असणार आहे. या ठिकाणी वीज, पाणी यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत, मात्र जर त्या नसतील तर उपलब्ध केल्या जाणार आहेत. (हेही वाचा: लॉकडाउनच्या परिस्थितीत नागरिकांनी राज्यात लष्कराची मदत घेण्याची वेळ आणू नका, अजित पवार यांचा इशारा)
अशा खोल्यांचा वापर विलगीकरण कक्ष किंवा तात्पुरत्या स्वरूपातील रूग्णालय म्हणून केला जाऊ शकतो. आपत्कालीन यंत्रणेकडून यातील अनेक इमारतींचा वापर देखील सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हे कर्मचारी आवश्यक त्या वेळी उपलब्ध असणार आहेत. अशाप्रकारे कोरोना व्हायरसच्या या लढाईत बांधकाम मंत्रालय मोठा वाटा उचलत आहेत. दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 124 झाली असून, यामध्ये मुंबईत आणि ठाणे येथे प्रत्येकी एक रुग्ण नव्याने आढळून आला आहे.