Mumbai: खेळताना चुकून फुगा गिळल्याने 4 वर्षीय मुलाचा मृत्यू; अंधेरी येथील घटना
मुंबईतील अंधेरी येथून ही धक्कादायक घटना समोर येत आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. देवराज नाग असे या मुलाचे नाव असून आपल्या भावंडांसह घराबाहेर खेळत असताना ही दुर्घटना घडली.
फुगा फुगवताना अचानक गिळला गेल्याने एका 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील (Mumbai) अंधेरी (Andheri) येथून ही धक्कादायक घटना समोर येत आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, देवराज नाग (Devraj Nag) असे या मुलाचे नाव असून आपल्या भावंडांसह घराबाहेर खेळत असताना ही दुर्घटना घडली. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. चुकून गिळलेला फुगा मुलाच्या श्वासनलिकेला चिकटला आणि त्यामुळे त्याला श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला. परिणामी मृत्यू ओढावला, असे कूपर हॉस्पिटलमधून देण्यात आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (ठाणे येथे नाल्यात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू, स्थानिकांकडून संताप व्यक्त)
रात्री सुमारे 10.30 वाजता देवराज त्याच्या सात आणि तीन वर्षांच्या दोन भावांसोबत घराबाहेर खेळत होता. अचानक तो खोकू लागला. त्यानंतर देवराज याचे वडील सूरज आणि काका राजाराम यांनी तोंडातून फुगा काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी मुलाला तीन वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये नेले. परंतु, त्याचे प्राण वाचू शकले नाहीत, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
राजाराम यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिेलेल्या माहितीनुसार, आम्ही सर्वप्रथम देवराज याला अंधेरी येथील पटेल हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर Criticare हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला नानावटी रुग्णालयात हलवण्यास सांगितले. परंतु, नानावटी हॉस्पिटलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आले. Criticare हॉस्पिटलमध्ये नेले त्यावेळेस त्याच्या नाकातून रक्त येत होते आणि त्याच्या शरीराची काहीच हालचाल होत नव्हती, असे काका राजाराम यांनी सांगितले.
यापूर्वी लहान मुल खेळताना इमारतीवरुन पडून किंवा गटारात पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना तुमच्या ऐकिवात असतील. तसंच बर्थडे सेलिब्रेशनमध्ये फुगा, ब्लॉस्ट, फोम स्प्रे यामुळे अनेकदा दुर्घटना घडतात. त्यामुळे मुलं खेळत असताना त्यांच्याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सेलिब्रेशनमध्ये रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून देखील विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.