दरवर्षी मंत्रिमंडळाची एक बैठक रायगड किल्ल्यावर घ्यावी; छत्रपती संभाजीराजे यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विनंती

महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 79 व्या वर्षीही कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला पायी चालत सर केला आहे.

Sambhaji Raje (Photo Credits: Facebook)

पुणे दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पायी चालत किल्ला सर करण्याची मानस बोलून दाखवला. महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 79 व्या वर्षीही कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला पायी चालत सर केला आहे. यावर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पायी चालत शिवनेरी किल्ला सर करणारे कोश्यारी हे पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. यामुळे ही आपल्यासारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी सामाधान देणारी बाब आहे, असे बोलत संभाजीराजे यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे कौतूक केले आहे. तसेच दरवर्षी मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावे, अशी विनंतीही त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

राज्यपालांनी वयाच्या 79 वर्षी किल्ले शिवनेरी 'पायी' सर केला. ही आमच्या सारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी गोष्ट आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले त्याचे मी मनापासून स्वागत करतो. राज्यपाल महोदयांना माझी अजून एक विनंती असेल, जी मी अनेक वर्षांपासून मागणी करत आहे. दरवर्षी कॅबिनेटची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश आपण द्यावेत. जेणेकरून महाराजांनी ज्या ध्येयवादाने रायगड वर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल, संभाजीराजे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- नागपूरात कोविड रुग्णांसाठी मानकापूर येथे 1 हजार बेडचं जम्बो रुग्णालय; डॉ. नितीन राऊत यांची माहिती

छत्रपती संभाजीराजे यांचे ट्वीट-

शिवनेरी किल्ल्यावरून जाऊन आल्यानंतर कोश्यारी यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. शिवनेरीवर येण्याअगोदर अनेक जण मला पाऊस आहे, चिखल आहे असं सांगून घाबरवत होते पण केवळ महाराजांविषयी श्रद्धेचे स्थान माझ्या मनात असल्याने मी येथे येऊ शकलो, असेही कोश्यारी त्यावेळी म्हणाले आहेत.