'बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी?' परमबीर सिंह यांच्या गृहमंत्र्यांवरील आरोपानंतर अमृता फडणवीस यांचा सवाल

त्यात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील टीकेची संधी सोडली नाही.

Amruta Fadnavis | (Photo Credits: Facebook)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या गृहमंत्र्यांवरील आरोपानंतर राज्यात मोठा वादंग उभा राहिला आहे. मागील काही काळापासून चर्चेत असलेल्या अँटिलिया बॉम्ब प्रकरण (Antilia Bomb Scare Case) आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Death Case) एपीआय सचिन वाझे (API Sachin Vaze) यांचे नाव समोर आल्यानंतर परमबीर सिंह यांची आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर अवघ्या 2-3 दिवसांत त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहीले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. यावरुन विरोधकांनी गृहमंत्र्यांसह सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीर यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील टीकेची संधी सोडली नाही.

एक शायरी ट्विट करत त्यांनी एक सवाल केला आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी?" या ट्विटवरुन त्यांचा रोख गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे दिसून येते. (परमबीर सिंग यांनी आपले आरोप सिद्ध केले पाहिजेत, मी त्यांच्याविरूद्ध मानहानीचा खटला दाखल करीत आहे- Home Minister Anil Deshmukh)

अमृता फडणवीस ट्विट:

यापूर्वी देखील अमृता फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची आणि सर्व प्रकाराची केंद्रीय चोकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे. तसंच राज्य सरकारला केंद्रीय तपासणी मान्य नसल्यास न्यायालयच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, असेही ते म्हणाले. या सर्व प्रकरणावर आता मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.