Thackeray on Amit Shah: अमित शाह मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा क्रमांक एकचा शत्रू; 'सामना'तून 'मार्मिक' शब्दात टीका

निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Bow and Arrow) हे दोन्ही एकनाथ शंदे गटाला देऊन टाकले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट प्रचंड आक्रमक झाला आहे. आजवर शिसेनेचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या दैनिक सामना (Daily Saamana) संपादकीयातून प्रचंड टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

Thackeray on Amit Shah: अमित शाह मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा क्रमांक एकचा शत्रू; 'सामना'तून 'मार्मिक' शब्दात टीका
Uddhav Thackeray, Amit Shah | (Photo Credits: Archived, edited)

निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Bow and Arrow) हे दोन्ही एकनाथ शंदे गटाला देऊन टाकले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट प्रचंड आक्रमक झाला आहे. आजवर शिसेनेचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या दैनिक सामना (Daily Saamana) संपादकीयातून प्रचंड टीकास्त्र सोडण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग (ECI) आणि अमित शाह हे या संपादकीय आणि टीकेचे प्रमुख लक्ष्य आहे. अमित शाह हे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा क्रमांक एकचा शत्रू असल्याचे सामना संपादकीयात म्हटले आहे. या टीकास्त्रावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

काय म्हटले आहे सामनात?

निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतचा निकाल मिंध्यांच्या बाजूने दिला तरी शिवसेना ही ठाकऱ्यांचीच होती, आहे व राहील. महाराष्ट्रात किमान दोन हजार कोटींचा सौदा करून आधी सरकार विकत घेतले व आता धनुष्यबाणाचा, शिवसेना नावाचा सौदा करण्यात आला. ही कसली लोकशाही? मोदी युग संपले आणि बाळासाहेब ठाकरे व त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजपला कुत्रेही विचारणार नसल्यानेच त्यांनी शिवसेनेवर दरोडा टाकला व आपले तळवे चाटणाऱ्या मिंध्यांना मुख्यमंत्री केले. हिंदुत्वरक्षक, मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या शिवसेनेचे अस्तित्वच नष्ट करणारा हा निकाल महाराष्ट्राला मान्य नाही. न्याय झाला नाही व निकाल विकत घेतला. व्यापाऱ्यांच्या राज्यात दुसरे काय होणार? लढाई सुरूच राहील! (हेही वाचा, संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण)

शिवसेना हे नाव व चिन्ह विकत घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाची कमळी पायातले घुंगरू तुटेपर्यंत नाचत आहे. मिंधे गटापेक्षा भारतीय जनता पक्षालाच आनंदाचे भरते आले आहे. एखाद्या दुकानातून चणे, शेंगदाणे विकत घ्यावेत, अशा पद्धतीने शिवसेना हे नाव आणि चिन्हाबाबतचा ‘निकाल’ विकत घेतला हे आता लपून राहिलेले नाही. एखाद्या प्रॉपर्टीचा सौदा करावा अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने ठाकऱ्यांनी निर्माण केलेली, जोपासलेली शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्या मिंध्यांच्या हातात दिली. शिवजयंतीच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले व त्यांनी मिंध्यांना शिवसेना-धनुष्यबाण मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले ते याच अमित शहांच्या मेहेरबानीने हे काय आता लपून राहिले? हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे श्रीमान शहांच्या कच्छपी लागून जे स्वतःचा राजकीय कंडू शमवीत आहेत, त्या सगळय़ांना महाराष्ट्राचे दुष्मन मानावे लागेल.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या स्वराज्याच्या मुळावर आलेल्या प्रत्येक ‘शाहय़ां’चा कोथळा छत्रपती व त्यांच्या मावळय़ांनी काढला. छत्रपतींचा तोच विचार घेऊन महाराष्ट्र आजही जिवंत, धगधगत आहे. बेइमान व गद्दारांना शिवाजी महाराजांनी जन्माची अद्दल घडवली हा इतिहास कुणालाच विसरता येत नाही. त्याच शिवरायांचा वारसा शिवसेना सांगते. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतचा निकाल मिंध्यांच्या बाजूने दिला तरी शिवसेना ही ठाकऱ्यांचीच होती, आहे व राहील. 40 बेइमान आमदार, 12 खासदार म्हणजे शिवसेना, असा निकाल देऊन लोकभावना व कायद्याचे धिंडवडे काढले गेले. मग लाखो शिवसैनिकांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या पुढय़ात त्यांची पाठवली, त्यांना किंमत नाही? शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, उपनेते यांच्या प्रतिज्ञापत्रांना मोल नाही? शिवसैनिकांनी ज्यांना निवडून आणले त्यांची डोकी मोजून धनुष्यबाण व पक्षाच्या स्वामित्वाचा निकाल देणे ही घटनेशीच बेइमानी आहे. ठाकऱ्यांच्या नावावर त्यांना मते मिळाली. उद्याही ती मिळतीलच व पुन्हा हे लोक निवडून येतीलच अशी खात्री नसताना त्या बाजारबुणग्यांच्या भरवशावर शिवसेना व धनुष्यबाणाचे भविष्य ठरवण्यात आले. निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा गुलाम बनल्याचेच हे लक्षण आहे. बेइमान आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने त्यांचा निकाल थांबवायला हवा होता.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. त्याला ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. खास करुन आजच्या सामना संपादकीयातूनह हे टीकास्त्र सोडण्यात आले.

(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2023 09:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).