Alcohol Shops: औरंगाबाद मध्ये दारूविक्री सुरु केल्यास महिला रस्त्यावर उतरून दुकाने बंद करायला लावतील; खासदार इम्तियाझ जलील यांचा इशारा
औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलील यांनी कोरोनाच्या संकट काळात दारू विक्रीला सुरुवात करण्याची काहीच गरज नाही असे म्हणत या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) रेड झोन (Red Zone) सहीत राज्यभरात दारू विक्रीला (Alcohol Selling) परवानगी दिली असल्याने तळीरामांना चांगलाच आनंद झाला आहे, मात्र औरंगाबाद (Aurangabad) मध्ये काहीसे वेगळे दृश्य पाहायला मिळतेय. औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलील यांनी कोरोनाच्या संकट काळात दारू विक्रीला सुरुवात करण्याची काहीच गरज नाही असे म्हणत या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. एवढचं नव्हे तर जर का औरंगाबाद मध्ये दारूची दुकाने उघडली तर लॉक डाऊनचे (Lockdown) सर्व नियम मोडून जिल्ह्यातील महिलाना रस्त्यावर यावे लागेल आणि ही दुकाने बंद पाडली जातील असा इशाराही खासदार जलील यांनी दिला आहे. या कठीण काळात दारूची विक्री सुरु झाल्यास महिलांच्या समस्येत भर पडू शकते त्यामुळे हा निर्णय योग्य नाही असे मत जलील यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात कोरोनाच्या संकटामुळे लॉक डाउन सुरु आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हा अवधी 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. उद्योग धंदे बंद असल्याने अर्थचक्र थांबून आहे. अशावेळी राज्य सरकारच्या उत्पन्नाला चालना मिळावी म्हणून दारू विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यानुसार, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये दारू विक्री सुरु होईल असे स्पष्ट होतेच, तर त्यात जोड म्हणून आता रेड झोन म्हणजेच कोरोनाचे अधिक रुग्ण असणाऱ्या भागात सुद्धा या व्यवसायाला परवानगी देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोन मध्ये मात्र कोणतेही दुकान सुरु होणार नाही.(रेड, ग्रीन ऑरेंज झोन पैकी कोणत्या झोन मध्ये तुमचा जिल्हा येतो हे पाहण्यासाठी क्लिक करा)
ANI ट्विट
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार, सद्य घडीला राज्यात एकूण 12हजार 974 रुग्ण आहेत, यापैकी 10 हजार 311 जणांवर उपचार सुरु आहेत, तर 548 जणांचा या कोरोनाने बळी घेतला आहे. दिलासा म्हणजे 2 हजार 115 जणांनी कोरोनावर मात केली आहे.