AI Voice Cloning Fraud: एआय व्हॉईस क्लोन द्वारे मुंबईतील व्यवसायिकास 80,000 रुपयांचा गंडा, परिसरात खळबळ
धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडिताला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial intelligence) व्हॉईस क्लोनिंग द्वारे कॉल केला आणि 80,000 रुपयांना गंडा घातला.
AI Fraud: मुंबई येथून घोटाळेबाजांनी लोकांच्या फसवणुकीचे नवेच तंत्र अवगत केले आहे. तंत्रज्ञान जसे प्रगत होत आहे तसेच, गुन्हेगारही अत्याधुनिक होत आहेत. ज्याचा सामान्य नागरिक, उद्योजक आणि अगदी उच्चभ्रू असलेल्या मंडळींनाही फटका बसत आहे. पवई येथून अशीच एक घटना पुढे येत आहे. येथील एक 68 वर्षीय व्यावसायिक (Mumbai Businessman) आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हॉईस क्लोनिंग (AI Voice Cloning) घोटाळ्याला बळी पडला. धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडिताला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial intelligence) व्हॉईस क्लोनिंग द्वारे कॉल केला आणि 80,000 रुपयांना गंडा घातला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच, अशा प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्याचे नवेच आव्हान पोलिसांसमोरही उभे ठाकले आहे. दरम्यान, व्यवसायिक विनोद केटी यांनी कांजूरमार्ग पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.
फोनवरुन ऐकवला मुलाचा आवाज
व्यवसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने पवई येथील 68 वर्षीय व्यावसायिकाला दुबईतील भारतीय दूतावासातून कथितपणे कॉल केला. ज्यामध्ये आरोपीने सांगितले की, व्यापारी केटी विनोद यांच्या 43 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली होती. त्याच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आरोपीने केलेला खोटा दावा व्यावसायिकाला ओळखताच आला नाही. व्यवसायिकाचा विश्वास बसावा म्हणून आरोपीने मुलाचा आवाजही फोनवर ऐकवला. ज्यामध्ये तो रडत असल्याचे ऐकू येत होते.
आवाजातील साम्य पाहून पाडित गोंधळला
कांजूरमार्ग पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संगितले की, व्यावसायिकास (विनोदी केटी) आरोपीकडून 30 मार्च रोजी फोन आला आणि त्याचा मुलगा अमित याला दुबईत अटक झाल्याचे सांगण्यात आले. तक्रारीत विनोदने म्हटले आहे: "मला धक्का बसला होता. मी सावरण्यापूर्वी त्या व्यक्तीने मला माझ्या मुलाचा आवाज ऐकायला लावला आणि तो रडत होता. त्याला जामीन देण्यास सांगत होता. फसवणूक करणाऱ्याने मला माझ्या मुलाच्या मोबाईलवर फोन करायला वेळ दिला नाही. त्याऐवजी, त्यांनी मला ताबडतोब पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले."
GPay द्वारे पैसे ट्रान्सफर
आरोपीने पीडित व्यवसायिक विनोद यांना GPay द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. आरोपीच्या दबावाला बळी पडत व्यवसायिकाने आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यास तातडीने पैसे हस्तांतरीत करण्यास सांगितले. मात्र, पैसे खात्यावरु वळतेहोताच आरोपीने तातडीने फोन बंद केला. त्यामुळे व्यवसायिकास संशय आला. त्यांनी तातडीने आपल्या मुलाशी संपर्क केला असता मुलगा सुखरुप असून तो त्याच्या दुबईतील घरी असल्याचे समजले. त्यामुळे विनोद यांच्या लगेच लक्षात आली की आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर त्यांनी पलिसांत धाव घेत तक्रार दिली.
मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने या घटनेची दखल घेतली आहे. प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा माग काढण्यासाठी सायबर टीम बँकेच्या तपशीलांचा मागोवा घेत आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.