Ahmednagar: पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जवाहर नवोदय विद्यालयात 16 विद्यार्थी, 3 शिक्षक कोरोना संक्रमित
या सर्वांना सर्दी आणि खोकला अशी प्राथमिक लक्षणे होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटीव्ह आली.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एका शाळेत 16 विद्यार्थी आणि 3 शिक्षक कोरोना व्हायरस (Coronavirus ) संक्रमित आढळले आहेत. या सर्वांना सर्दी आणि खोकला अशी प्राथमिक लक्षणे होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटीव्ह आली. ही शाळा पारनेर (Parner) तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर (Takli Dhokeshwar) येथील असून, जवाहर नवोदय विद्यालय (Jawahar Navodaya Vidyalaya) असे या शाळेचे नाव आहे. पॉझिटीव्ह आलेल्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांची तपासणी सुरु आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान, पाथर्डी येथील तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सात विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे नुकतेच पुढे आले होते. त्यानंतर आता पारनेर येथील शाळेत कोरोना संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. प्राप्त माहितीनुसार टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात सुमारे 406 विद्यार्थी शिक्षण घेतात. हे विद्यार्थी राज्यातील विविध भागांतून येत असतात. या विद्यार्थ्यांमधील काही विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला आणि ताप यांसारखी प्राथमिक लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे या सर्वांचीच तपासणी करण्याचा निर्णय विद्यालय प्रशासनाने घेतला. त्यातील काही विद्यार्थी संक्रमित आढळले. (हेही वाचा, Night Curfew In Maharashtra: महाराष्ट्रात आजपासून रात्री 9 ते पहाटे 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू; Omicron च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सावधगिरीचे पाऊल)
जवाहर नवोदय विद्यालयातील जे विद्यार्थी कोरोना संक्रमित आढळले आहेत ते सर्व इयत्ता सहावी ते बारावी या वर्गात शिक्षण घेणारे आहेत. शाळेच्या वसतीगृहात ते निवासाला असतात. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनाच सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे शाळेने त्यांचीच तपासणी करण्याचा निर्णय घेतला मात्र, एकेकाची तपासणी करता करता कोरोना संक्रमितांची संख्या वाढत गेली. त्यामुळे शाळा प्रशासनालाही धक्का बसला आहे. संक्रमित आढळलेल्या सर्व विद्यार्थ्यांवर पारनेर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शाळा वसतीगृह आणि आवारात राहणाऱ्या सर्व विद्यार्थी, शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.