Priya Berde Quit NCP: अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपामध्ये प्रवेश; कारण अद्याप गुलदस्त्यात

आजच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजप प्रवेश केला. नाशिक येथे भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारणी बैठकीत हा पक्षप्रवेश झाला.

Priya Berde | (Photo Credits: Facebook)

अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला सोचिठ्ठी दिली आहे. आजच त्यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. प्रिया बेर्डे यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली होती. मात्र, अवघ्या दोनच वर्षांत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कंटाळल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजप प्रवेश केला. नाशिक येथे भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारणी बैठकीत हा पक्षप्रवेश झाला.

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि मराठी अभिनेत्री अशी प्रिया बेर्डे यांची ओळख आहे. प्रदीर्घ काळ अभिनयात कारकीर्द गाजवल्यावर त्यांनी राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला (2020) सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले. अवघ्या दोनच वर्षात घड्याळ बाजूला ठेवत त्यांनी भाजपचे कमळ धरले. दरम्यान, प्रिया बेर्डे यांच्यासह इतरही काही अभिनेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे समजते. त्यांची नावे अद्याप पुढे आली नाहीत. याशिवाय इतरही काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश झाला. (हेही वाचा, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का निवडला? कारण घ्या जाणून)

शरद पवार यांनी अनेक कलाकारांना अडचणीच्या वेळी मदत केली आहे. शरद पवार यांना कलेची आणि कलाकारांचीही चांगली जाण आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्या मनात कमालीचा आदर आहे. शिवाय लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी कलाकारांना मोठ्या प्रमाणावर मदत केली, अशा भावना प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केल्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणत्या कारणास्तव सोडला याबाबत मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.