Ambadas Danve On Samruddhi Expressway Accident: समृद्धी द्रुतगती मार्गावरील अपघात 'मानवनिर्मित', महाआघाडीचे नेते अंबादास दानवे यांचा दावा; मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी
पोलीस आणि आरटीओने या एक्स्प्रेस वेवर योग्य कारणासाठी वाहने थांबवली पाहिजेत, मात्र, येथे तसं होत नाही. त्यांनी ओव्हरलोड असलेल्या मिनी बसची तपासणी करायला हवी होती असं मत दानवे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे.
Ambadas Danve On Samruddhi Expressway Accident: समृद्धी द्रुतगती मार्गावरील अपघात (Accident) मानवनिर्मित असल्याचा दावा महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. रविवारी मध्यरात्री समृद्धी एक्स्प्रेस वेवर (Samruddhi Expressway) मिनी बस ट्रकला धडकून भीषण अपघात झाला. वाहनांनी इंटरचेंज टोल ओलांडल्यानंतर आणि एक्स्प्रेस वेवर प्रवेश करण्यापूर्वी आरटीओने त्यांची तपासणी केली पाहिजे. आरटीओच्या पथकाने एक्स्प्रेस वेवर धावणारा ट्रक थांबवला. त्यामुळे मिनीबस ट्रकला धडकली, असे दानवे यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.
समृद्धी एक्स्प्रेस वे हा एक व्यावसायिक रस्ता बनला आहे. पोलीस आणि आरटीओने या एक्स्प्रेस वेवर योग्य कारणासाठी वाहने थांबवली पाहिजेत, मात्र, येथे तसं होत नाही. त्यांनी ओव्हरलोड असलेल्या मिनी बसची तपासणी करायला हवी होती असं मत दानवे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे. एक्स्प्रेस वेवर वाहने थांबवू नयेत, अन्यथा या एक्स्प्रेस वेचा उद्देश काय? अशा प्रकारे वाहने थांबवणे म्हणजे या एक्स्प्रेस वेवर मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. या एक्स्प्रेस वेवर हेतुपुरस्सर वाहने थांबविणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असही यावेळी दानवे म्हणाले. (हेही वाचा -Samriddhi Highway Accident: ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या धडकेत समृध्दी महामार्गावर भीषण अपघात, दहा जण दगावले, बचाव कार्य सुरु)
शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी दावा केला की, समृद्धी एक्स्प्रेस वेवर प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फक्त श्रेय घ्यायचे आहे, त्यांनी एक्स्प्रेस वेवर होणाऱ्या अपघातात मृत्यूची जबाबदारीही घ्यावी. सरकारवर दोषी मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हा अपघात दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. समृद्धी द्रुतगती मार्गावर वारंवार होणारे अपघात हे चिंतेचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय कोथळे यांनी पीटीआयला सांगितले की, दानवे यांच्या दाव्याची आपल्याला माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, जबाब नोंदवले जात आहेत.
दरम्यान, आज जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी अपघातातील जखमींची भेट घेतली. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासनही यावेळी भुमरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी समृद्धी एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रत्येक मृताच्या नातेवाइकांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगून X वरील पोस्टमध्ये वैजापूरजवळ झालेल्या भीषण अपघातामागील कारणे शोधण्याचे निर्देश दिले आहेत.