मुंबई: 5 रुपयांसाठी रिक्षाचालकाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून हत्या
एका रिक्षाचालकाची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी चक्क 5 रुपयांसाठी हत्या केली आहे.
मुंबईमधील (Mumbai) बोरिवली (Borivali) उपनगरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रिक्षाचालकाची (Auto Driver) पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी चक्क 5 रुपयांसाठी हत्या (Murder) केली आहे. रामदुलार यादव (वय, 65 वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे. रामदुलार हे रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बोरीवली पूर्वेकडील मागाठणे पोलिस चौकीजवळील पेट्रोल पंपावर गेले होते. सीएनजी गॅस भरून झाल्यानंतर रामदुलार यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला गॅसचे पैसे दिले.
दरम्यान, रामदुलार यांनी 5 रुपये कमी दिल्याचा दावा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने दिला. तसेच रामदुलार यांनी 5 रुपये दिल्याचा दावा केला. या शुल्लक कारणावरून रामदुलार आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले आणि यातचं रामदुलार यांचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (हेही वाचा - धक्कादायक! गुंगीचे औषध देऊन डॉक्टरने तरुणीवर केला बलात्कार; भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल)
याप्रकरणी पोलिसांनी रामदुलार यांना मारहाण करणाऱ्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. संदीप जाधव, अक्षय मानकुंभरे, संतोष शेलार, संतोष जाधव आणि रविंद्र मानकुंभरे, अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी या पाच जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.