Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 99.33 टक्के पाणीपुरवठा

मध्य वैतरणा 97.51 टक्के, अप्पर वैतरणा 99.36 टक्के, भातसा 99.04 टक्के, विहार 100 टक्के आणि तुळशी 100 टक्के पाणी पातळी उपलब्ध आहे.

Lake प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credits: ANI)

Mumbai: मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबईकरांची (Mumbaikar) पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील सामूहिक तलावांची पातळी आता 99.33 टक्के इतकी झाली आहे. यासंदर्भात बीएमसीने (BMC) आकडेवारी जाहीर केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी, मुंबईला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा आता 14,47,363 दशलक्ष लिटर म्हणजेचं 99.33 टक्के इतका आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेला मोडक सागर तलाव 27 जुलै रोजी रात्री 10.52 वाजता ओसंडून वाहू लागला. यापूर्वी 20 जुलै रोजी शहर आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तुळशी तलाव ओसंडून वाहत होता. मुंबई शहराला तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा येथून पाणी पुरवठा केला जातो. (हेही वाचा - Mumbai Traffic Update: Eid-e-milad च्या पार्श्वभूमीवर आज मुंबई मध्ये 'या' मार्गांवर वाहतूकीत बदल)

नागरी संस्थेने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, तानसा जलाशयात पाण्याची पातळी 99.26 टक्के इतकी असून मोडक-सागर जलाशयात 99.99 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मध्य वैतरणा 97.51 टक्के, अप्पर वैतरणा 99.36 टक्के, भातसा 99.04 टक्के, विहार 100 टक्के आणि तुळशी 100 टक्के पाणी पातळी उपलब्ध आहे.

दरम्यान, मुंबई आणि उपनगरात पुढील काही दिवसांत गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि आसपासच्या उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.