जळगाव: मोबाइलमध्ये मृत्यू कधी आणि कसा होणार हे पाहून 8 वी मधील विद्यार्थ्याची आत्महत्या

एका वेबसाईटवर जन्मतारीख टाकून मृत्यू कधी आणि कसा होतो हे पाहिल्यानंतर एका 8 वी तील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

जळगाव (Jalgaon) येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका वेबसाईटवर जन्मतारीख टाकून मृत्यू कधी आणि कसा होतो हे पाहिल्यानंतर एका 8 वी तील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हर्षल दीपक कुंवर (13) असे या मृत मुलाचे नाव असून तो धुळे (Dhule) तालुक्यातील शिंदखेडा येथील रहिवासी होता. मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली आणि कुटुंबियांच्या दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये तीन-चार महिन्यांपासून तो जळगाव येथे आपल्या मामाच्या घरी आला होता. लोकसत्ताने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

कामानिमित्त मामा घराबाहेर गेले होते. त्यामुळे हर्षल आणि त्याची आजी प्रमिलाबाई दोघेच घरी होते. परंतु, दुपारी दोनच्या सुमारास आजी दुकानावर गेली असताना हर्षलने बाथरुममध्ये साडीने गळफास घेत आत्महत्या केली. आजी घरी परतल्यावर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यानंतर तातडीने त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढे जिल्हा रुग्णालयातही हलवण्यात आले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. (धक्कादायक! शेअर मार्केटमधील मुलाच्या गुंतवणूकीमुळे झालेल्या कर्जाला कंटाळून सांगलीत कुटुंबाची आत्महत्या)

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहाणी केल्यावर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी हर्षलने एका वेबसाईटमध्ये स्वतःची जन्मतारीख टाकून मृत्यू कधी होणार, असं सर्च केलं होतं. तसंच यूट्यूबसह अनेक वेबसाइट ओपन केल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याने बाथरुममध्ये जावून गळफास घेतला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर अधिक तपास सुरु असून त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, हर्षल याच्या वडीलांचा कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. तर आई भाजीपाला विक्री करते. त्याला एक लहान बहिण देखील आहे. मुलाच्या हट्टापायी काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईने हप्त्यावर 15 हजार रुपयांचा मोबाईल फोन खरेदी करुन दिला होता.