माजलगाव नगरपालिकेत 5 कोटींचा आर्थिक घोटाळा; भाजपचे नगराध्यक्ष सहाल चाऊससह दोन मुख्यधिकाऱ्यांना अटक, कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी

या प्रकरणी पालिकेच्या दोन मुख्यधिकाऱ्यांसह भाजपचे नगराध्यक्ष सहाल चाऊस (Sahal Chaus) यांना आज अटक करण्यात आली

सहाल चाऊस (Photo Credit : Facebook)

बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) नगरपालिकेत 5 कोटींपेक्षा जास्त आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी पालिकेच्या दोन मुख्यधिकाऱ्यांसह भाजपचे नगराध्यक्ष सहाल चाऊस (Sahal Chaus) यांना आज अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. मुख्यधिकाऱ्यांसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटक झाल्यानंतर सहाल चाऊस यांची चौकशी करण्यात आली, त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले गेले. न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

माजलगाव नगर पालिकेत विविध विकास कामांमध्ये पाच कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार  झाल्याचे समोर आले होते. याबाबत चाऊस यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत, त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या काळात सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोपही केला गेला होता. या प्रकरणी डिसेंबर 2019 मध्ये तीन मुख्याधिकारी, लेखापाल व इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही अधिकारी फरार झाले होते. आज या अधिकाऱ्यांना पुणे येथून अटक करण्यात आली. (हेही वाचा: मुंबई महानगरपालिकेच्या The Municipal बँकेमध्ये कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा)

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये सहाल चाऊस यांचाही सहभाग असल्याचे दिसून आले. त्यानंतर आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी सहाल यांनाही आज अटक केली. माजलगाव नगरपरिषदेला 14 व्या वित्त आयोगासह, विविध विकास कामातून आलेल्या निधीमधून जवळजवळ 5 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार एका नगरसेवकाने केली होती. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले होते. लक्ष्मण राठोड हा यातील मुख्य आरोपी असून, त्याला याआधीच अटक करण्यात आली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजार केल्यानंतर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी.ए. वाघमारे यांनी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.