34th Pune Festival: मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2 सप्टेंबर रोजी होणार यंदाच्या 'पुणे फेस्टिव्हल'चे उद्घाटन
सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
यंदाचा 34 वा पुणे फेस्टिव्हल (Pune Festival) या वर्षी 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी अभिनेता सुनील शेट्टीदेखील उपस्थित राहणार आहे. महोत्सवाचा उद्घाटन सोहळा 2 सप्टेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी 5 वाजता होणार असल्याची माहिती महोत्सवाचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल व महोत्सवाचे मुख्य संयोजक डॉ.सतीश देसाई यांनी दिली.
पुण्याचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवणारे उद्योगपती राहुल बजाज यांना यंदाचा महोत्सव समर्पित असल्याचे देसाई यांनी सांगितले. उद्घाटन समारंभात ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी गणेश वंदना करणार आहेत. उद्घाटन सोहळ्याला राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मंगल प्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या सोहळ्यात सिम्बायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ.एस. बी. मुझुमदार यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यासोबतच पं.भीमसेन जोशी, लता मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पं.शिवकुमार शर्मा, दिलीपकुमार यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात येणार आहे. औस इंडिया मुशायरा, अशोक हांडे यांचा 'आझादी का अमृत महोत्सव', शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची मैफल, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा आदी कार्यक्रम यावेळी होणार आहेत. (हेही वाचा: Mount Mary Fair: 11 ते 18 सप्टेंबर या कालावधीत मुंबईमध्ये होणार माउंट मेरी जत्रा; जय्यत तयारी सुरु)
गणेश महोत्सवादरम्यान होणाऱ्या या दहा दिवसीय महोत्सवाचे आयोजन पुणे फेस्टिव्हल कमिटी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. या फेस्टिव्हलची सांगता 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी 1989 मध्ये पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केली होती.