Coronavirus: महाराष्ट्रात आज आणखी तीन कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण संक्रमित प्रकरणांची संख्या 48 वर
देशात महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूची सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत
सध्या केंद्र सरकार तसेच राज्य सरकारसमोर कोरोना विषाणूचे (Coronavirus) फार मोठे संकट उभे आहे. देशात महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कोरोना विषाणूची सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. अशात राज्यात आज आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णाची नोंद झाली. अहमदनगर जिल्ह्यातील एका 51 वर्षीय पुरुषाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ही व्यक्ती आपल्या पत्नीसह दुबईला गेली होती. सुदैवाने या व्यक्तीच्या पत्नीची कोरोना विषाणू चाचणी निगेटिव्ह आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ही माहिती दिली. अशाप्रकारे सध्या राज्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 48 वर गेली आहे.
राज्यात आज 78 संशयित रुग्णांना भरती झाली आहे. बाधित भागातून आलेल्या 1305 प्रवाशांपैकी 1036 जणांची विलगीकरण कक्षात भरती करण्यात आली आहे. त्यापैकी 971 जणांचे कोरोना व्हायरस नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर सध्या राज्यात 48 जण पॉझिटिव्ह आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई विमानतळावरील प्रवाशांच्या स्क्रीनींग सुविधेची पाहणी केली व तपासणी करणाऱ्या डॉक्टरांशी साधला संवाद. यावरून कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. (हेही वाचा: खबरदार! पळून जाल तर, क्वारंटाईन विभागातून पळणाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा)
दरम्यान, स्वस्त धान्य दुकानात एप्रिल सोबतच मे व जून महिन्याचे धान्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अजून वाढू नये यासाठी, आता सरकारने देशात सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे लँडिंग बंद केले आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या लँडिंगवरील हे निर्बंध 22 मार्चपासून लागू होणार आहेत. सरकारने घातलेली बंदी 22 मार्चपासून एका आठवड्यासाठी लागू होईल. तसेच, 65 वर्षांवरील लोकांना आणि 10 वर्षाखालील मुलांना घरातच राहण्याची सूचना देण्यात आली आहे.