वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना मिळणार 25 लाखांचे अर्थसहाय्य; वनमंत्री Sudhir Mungantiwar यांची माहिती
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड/वानर यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास मृत्यू, कायम अपंगत्व, गंभीर जखमी, किरकोळ जखमी या वर्गवारीनुसार अर्थसहाय्य संबंधितांना अदा करण्यात येते.
शुक्रवारी विधानसभेत, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू, कायमचे अपंगत्व आणि जखमींच्या प्रकरणांमध्ये सरकारकडून आर्थिक मदतीत वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. अशा घटनांमध्ये एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, त्यांच्या निकटवर्तीयांना आता 25 लाख रुपये मिळणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
राज्यात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली असून मानव– वन्यजीव संघर्षामध्येही वाढ होत आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत असून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन-विकास योजने अंतर्गत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे. मनुष्यहानीच्या वाढत्या घटनांमुळे कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूमुळे, व्यक्तीला गंभीर अपंगत्व आल्यामुळे त्या कुटुंबाचे मोठे नुकसान होते. याची दखल आता शासनाने घेतली आहे.
यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्यानुसार व्यक्तीला कायम अपंगत्व आल्यास 7 लाख 50 हजार रुपये, व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येणार आहे. (हेही वाचा: Law and Order In Maharashtra: 'यावर्षी राज्यात खून, दरोडा, घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांची घट'; राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत Devendra Fadnavis यांनी दिली सविस्तर माहिती)
मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, सध्याच्या आर्थिक तरतूदीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, कायमस्वरुपी अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी व्यक्तीला द्यावयाची आर्थिक मदत त्या मानाने कमी असल्याबाबत व त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. लोकप्रतिनिधींकडून आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत मागणीही होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला.
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड/वानर यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास मृत्यू, कायम अपंगत्व, गंभीर जखमी, किरकोळ जखमी या वर्गवारीनुसार अर्थसहाय्य संबंधितांना अदा करण्यात येते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक वेळा मनुष्य मृत्यू होत नाही, परंतु गंभीर किंवा किरकोळ जखमी होतात.