Girl Harassed on Mumbai Local Train: धक्कादायक! तरुणीचा विनयभंग करून धावत्या लोकलमधून बाहेर फेकण्याचा प्रयत्न; एकाला अटक
ठाण्यावरून कसाऱ्याला जात असताना एका 21 वर्षीय तरूणीचा विनयभंग (Harassment) करत तिला धावत्या लोकलमधून खाली फेकून देण्याचा प्रयत्न झाला आहे.
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असतानाच मुंबई लोकल रेल्वेमध्ये (Mumbai Local Train) एका तरुणीसोबत जीवघेणा प्रसंग घडला आहे. ठाण्यावरून कसाऱ्याला जात असताना एका 21 वर्षीय तरूणीचा विनयभंग (Harassment) करत तिला धावत्या लोकलमधून खाली फेकून देण्याचा प्रयत्न झाला आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (25 नोव्हेंबर) घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. तर, दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. महिला डब्ब्यात हा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कसाऱ्यातील रहिवासी असून ठाण्यातील एका मॉलमध्ये नोकरीला आहे. यामुळे ती नियमितपणे कसारा ते ठाणे लोकलने प्रवास करते. दरम्यान, 25 नोव्हेंबर रोजी ही तरुणी नेहमीप्रमाणेच ड्यूटी संपल्यानंतर ठाण्याहून लोकलने कसाऱ्याला जात होती. ज्यावेळी ही तरूणी महिला डब्ब्यात बसली, त्यावेळी अनेक महिला तिच्यासोबत प्रवास करत होत्या. परंतु, आठगाव स्थानक गेल्यानंतर डब्बा रिकामा झाला. डब्ब्यात तरुणी एकटीच होती. आठगाव स्थानकावरून गाडी निघाल्यानंतर दोन तरुण धावतच डब्ब्यात चढले. दोन्ही तरुण मद्यधुंद्य अवस्थेत होते. या दोघांचे हावभाव पाहून तरुणी घाबरली. तिने लगेच मोबाईलवर दोघांचे फोटो काढून तिच्या नातेवाईकांना तातडीने पाठविले. याचदरम्यान, दोघा जणांनी तिची विनयभंग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तरुणीने शेवटपर्यंत त्या तरुणांचा प्रतिकार केला. या झटापटीत दोघांनी तिला धावत्या लोकलमधून खाली फेकून देण्याचाही प्रयत्न केला आहे. लोकल स्थानकात येताच एक तरुण पसार झाला. तर दुसऱ्या आरोपीला तरुणीच्या नातेवाईकांनी पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Mumbai Local ट्रेन मध्ये महिला प्रवासांसोबत लहान मुलांना परवानगी नाही; रेल्वेस्थानकांत RPF जवान ठेवणार लक्ष
याआधी तीन दिवसापूर्वी धावत्या लोकलमध्ये एका महिलेला चाकू दाखवून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी आरोपीने तिच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाईलदेखील चोरी केला होता. ही घटना विरार ते कांदिवलीदरम्यान सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती.