लग्नानंतर अनेक वर्षांनीही असा जपून ठेवा नात्यातील गोडवा
काही वर्षांनतर नाते बोअरिंग होते, अशावेळी नात्यातील रोमान्स, गोडवा टिकवून ठेवणे फार गरजेचे आहे
बहुतेक लोकांची अशी तक्रार असते की, लग्नाच्या काही वर्षानंतर नात्यातील रोमान्स संपून गेला आहे, घर आणि जबाबदाऱ्यांमुळे नाते फार बोअरिंग झालेय. अशा गोष्टींची परिणीती नात्यातील गोडवा संपून ती जागा भांडण घेते. जर का तुमचीपण हीच कहाणी असेल तर नात्यामधील प्रेम परत आणण्यासाठी अथवा असलेले प्रेम टिकवून ठेवण्यासाठी फॉलो करा या गोष्टी
> एकमेकांचा सन्मान करा - भलेही तुमच्या लग्नाला कितीही वर्षे झाली असुदे, प्रत्येकवेळी आपल्या जोडीदाराचा सन्मान करा. समोरचा जोडीदार तुमच्या आयुष्यात किती महत्वाचा आहे हे नेहमी पटवून द्यायचा प्रयत्न करा. यासाठी आकाशातून चंद्र तारे तोडून आणायची गरज नाही. जोडीदाराच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या, त्याकडे लक्ष द्या. आपल्या जोडीदाराच्या वाईट गोष्टी मोजण्यापेक्षा जोडीदार जसा आहे तसा त्याचा स्वीकार करा.
> जोडीदाराच्या पसंतीकडे ध्यान द्या - कदाचित तुमच्या जोडीदाराच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी, छंद, आवडत्या जागा तुमच्यापेक्षा वेगळ्या असू शकतात. मात्र नेहमीच विरुद्ध असलेल्या एकमेकांच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या भांडणाचे कारण बनू शकतात. त्यामुळे आधी हे समजून घ्या की, दोघांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतात आणि त्यात काहीच गैर नाही. त्यामुळे अशा गोष्टींमुळे चीडचीड करण्यापेक्षा आपल्या जोडीदाराच्या आवडत्या गोष्टींमध्ये रस घ्या. दोघे मिळून अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.
> संवाद साधण्यासाठी मोबाईलला प्राधान्य देऊ नका - आजकालच्या जमान्यात वेळेच्या अभावाचा परिणाम प्रत्येक नात्यावर होतो. पती पतींचे नातेही याला अपवाद नाही. म्हणूनच आजच्या घडीला पती पत्नी एकमेकांशी बोलण्यासाठी मोबाईलला वापर करताना दिसून येतात. फोटोज-व्हिडीओजद्वारे एकमेकांना एकमेकांच्या जीवनात असणे भासवात. मात्र इथेच हळू हळू नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे प्रत्यक्षात एकमेकांच्यासोबत 'क्वालिटी टाईम' व्यतीत करणे फार गरजेचे आहे. एकत्र असण्यातला स्पर्श, गंध तुम्हाला नेहमीच एकमेकांच्या जवळ ठेवण्यास कारणीभूत ठरतो.
> बेडरूममध्ये एकमेकांच्या मतांचा आदर करा - तुम्हाला जेव्हा शारीरिक सुख हवे असेल तेव्हाच तुमच्या जोडीदाराला ते हवे असेल असे नाही. अशावेळी जोडीदाराच्या कलाने घ्या. काही गोष्टी घडत नाहीत म्हणून रागवण्यापेक्षा समोरच्याच्या मतांचा आदर करा. जर काही समस्या असेल तर दोघांनी एकत्र बसून बोला आणि त्यावर तोडगा काढा. शारीरिक सुखावेळी स्वतःसोबत जोडीदाराच्या गरजांकडेही लक्ष द्या.
> भावनिक आणि मानसिक कनेक्शन - नाते फक्त एकत्र राहण्याने आणि शारीरिक सुखानेच फुलते असे नाही. जेव्हा हळू हळू भावनिक आणि मानसिक गरजा पूर्ण व्यायला सुरुवात होते तेव्हा नातेही हळू हळू फुलत जाते. एकमेकांच्या सोबत राहून एकमेकांच्या स्वप्नाचा ध्यास घेणे, गोष्टी एकत्र करणे यातून एकमेकांची सवय होते. छोट्या छोट्या गोष्टी जसे की, एकत्र वॉक घेणे, शॉपिंग करणे, एकत्र व्यायाम करणे यांमुळेच तुम्ही आपल्या जोडीदाराच्या अजून जवळ येता.