Maharashtra Tourism: नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी MTDC कडून बंपर सवलती जाहीर; जाणून घ्या कुठे कराल बुकिंग

पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करीत उपहारगृह, रिसॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत.

Maharashtra Tourism (संग्रहित संपादित प्रतिमा)

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) पर्यटकांना सर्वोत्तम सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा देण्यासाठी सज्ज झाले असून आरक्षणासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. निवासी आरक्षण www.mtdc.co या संकेतस्थळावर सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे देण्यात आली आहे.

जेष्ठ नागरिकांसाठी 20 टक्के, शासकिय-कर्मचारी यांना आगाऊ आरक्षणासाठी 10 ते 20 टक्के सवलत आहे. आजी–माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. समूह आरक्षणासाठी 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे देण्यात आली आहे.

औरंगाबाद विभागातील अजंठा (फर्दापुर), लोणार, नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोनावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे ही पर्यटकांची मुख्य आकर्षण ठरत असून आतापर्यंत 90 टक्के आरक्षण झाले आहे.

पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहीती वेबसाईट, फेसबुक आणि व्हाट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

सध्याच्या वातावरणात पर्यटकांना आयुर्वेदीक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पर्यटकांना स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदिरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. स्थानिक कला, संस्कृती आणि परंपरा यांचा अनुभव घेता यावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे.  स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक यांना आणि उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन देतानाच पर्यटक निवासांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. योगा आणि वेलनेसची शिबिरे घेण्याचा मानस असुन स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपरिक खेळ इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. पर्यटक निवासाच्या 100 किमीच्या परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येणार आहे. (हेही वाचा: प्रवाशांसाठी खुशखबर, मध्य रेल्वे चालवणार हिवाळी आणि ख्रिसमस स्पेशल साप्ताहीक ट्रेन; फेऱ्या, वेळापत्रक आणि थांबे घ्या जाणून)

पर्यटकांना उत्तम सुविधा द्या : व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे एकुण 30 निवास आणि उपहारगृह यांचे परिचालन होत आहे. महामंडळाच्या कर्मचारी वर्गाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आज महामंडळाची ख्याती साऱ्या भारतभर पसरली आहे. केवळ महाराष्ट्रातुनच नव्हे तर देशभरातुन असंख्य अतिथी पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येत असतात. पर्यटकांना उत्तम सोयी-सुविधा पुरविल्या जाव्यात, अशा सूचना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा यांनी दिल्या आहेत.

सोयी – सुविधा

पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करीत उपहारगृह, रिसॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहुन प्री –वेडींग फोटोशुट आणि डेस्टीनेशन वेडींगचीही सोय करण्यात येणार आहे. वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या संकल्पनेअंतर्गत काही रिसॉर्टवर वाय फाय सुविधा पुरविण्यात येत आहेत. महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली  सर्वत्र नियोजन करण्यात येत आहे. पर्यटनाबरोबरच पर्यावरण आणि भारतीय संस्कृतीचा ठेवा जपत पर्यटनाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक  दिपक हरणे यांनी केले आहे.