Golden Jackals Enter Kharghar: खारघर आणि नवी मुंबई परिसारत का दिसतोय सोनेरी कोल्हा? काय आहे नेमके कारण? पर्यावरणवाद्यांमध्ये चिंता
त्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांविषयी आणि संवर्धनाच्या प्रयत्नांची तातडीची गरज यांबाबत येथे जाणून घ्या.
समुद्रकिनारपट्टीलगत खारफुटी (Mangroves), खाड्या आणि पर्वतांनी वेढलेल्या नवी मुंबईच्या खारघर येथील (Kharghar) नयनरम्य अशा निवासी भागात सोनेरी कोल्हा (Golden Jackals) आढळून येत आहे. दिवसेंदिवस सोनेरी कोल्ह्यांची संख्या आणि ते दिसण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढू लागले आहे. त्यामुळे पर्यावरणवादी आणि प्राणीप्रेमी धोक्याचा इशारा देत आहे. अशा प्रकारच्या वन्य प्राण्यांचे दिसने हे चिंताजनक आहे. वन्य प्राण्यांचा नैसर्गिक आदिवास (Wildlife Conservation) असलेल्या खारफुटी आणि पाणथळ जागा हळूहळू संपुष्टात (Habitat Loss) येत आहेत. त्यांचा मानवी हस्तक्षेपामुळे नाश होत आहे. परिणामी या प्राण्यांना मानवी वर्चस्व असलेल्या भागात अन्न आणि निवारा घेण्यास भाग पाडत आहे. वन्य प्राण्यांच्या नागरी वस्तीतील प्रवेशास हे प्राणी नव्हे तर मनुष्यच कारणीभूत असल्याचेही हे तज्ज्ञ (Animal Welfare) सांगतात.
मानव आणि वन्यजीव संघर्षात वाढ?
पशुप्रेमी असलेल्या प्रदीप चौधरीने अलीकडेच खारघरमधील निवासी वसाहतींच्या दिशेने जाणाऱ्या सोन्हेरी कोल्ह्याचे छायाचित्र काढले. भटक्या कुत्र्यांचे हल्ले, घाबरलेल्या रहिवाशांकडून दगडफेक आणि भरधाव वेगातील वाहनांच्या धडकेच्या जोखमीसह या प्राण्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलत होते. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडच्या काही महिन्यांत सोनेरी कोल्हेचे मृतदेह सापडले आहेत, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल धोक्याची घंटा वाजली आहे. खारघर वेटलँड्स अँड हिल्स फोरमच्या नेत्या ज्योती नाडकर्णी टीओआयशी बोलताना म्हणाल्या, "सागरी हरित आच्छादन आणि पाणथळ जागांच्या पद्धतशीर नाशामुळे हे संघर्ष उद्भवतात. या अधिवासांच्या संवर्धनासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले आणि विलंबामुळे अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे वन्यजीव संवर्धन होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. (हेही वाचा, Viral Video: विरार मध्ये Mangrove Ecotourism Site वर स्थानिकांना दिसला Humpback Dolphin; सोशल मीडीयात व्हिडीओ वायरल)
वन्य प्राण्यांनाही रेबीज होण्याची शक्यता?
महत्त्वाचे असे की, खास करुन बिबटे, सोनेरी कोल्हे यांसारखे प्राणी आजकाल नागरिक वस्तीत सहजपणे दिसू लागले आहेत. जंगले कमी झाल्याने हे मांसाहारी प्राणी अन्नाच्या शोधात नागरी वस्तीमध्ये शिरतात. येथे भटकी कुत्री हे त्यांचे प्रमुख अन्न असते. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक सांगतात की, नागरी वस्तीमध्ये असलेल्या अनेक कुत्र्यांना रेबीजसारखा आजार जडलेला असतो. या कुत्र्यांच्या संपर्कात जर हे प्राणीसुद्धा आले तर त्यांनाही या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्राण्यांचा नैसर्गिक आदिवास सुरक्षीत राहील याची काळजी घेणेही आवश्यक असल्याचे हे अभ्यासक सांगतात.
सोनेरी कोल्हे हे प्रामुख्याने खारफुटीची जंगले आणि समुद्रकिनारपट्टी भागात आढळतात. कारण या परिसरात त्यांना त्यांचे अन्न मुबलक प्रमाणात मिळते. याच अन्नाच्या शोधात ते रात्रीच्या वेळी बाहेर पडतात आणि नागरी वस्त्यांचा अंदाज न आल्याने वाट चुकतात आणि मनुष्याच्या निवासी वस्त्यांमध्ये शिरतात. त्यातूनही मग वन्य प्राणी आणि मनुष्य यांच्यात संघर्ष उद्भवतो.
दरम्यान, या वर्षाच्या म्हणजेच 2024 च्या सुरुवातीस खारघरच्या पाणथळ जागेत एक सोनेरी कोल्ह्याचा मृतदेह सापडला होता आणि दुसरा नोव्हेंबरमध्ये निवासी क्षेत्राजवळ सापडला होता. स्थानिक रहिवाशांनी सांगतात की, मानवी अतिक्रमण आणि खारफुटीतील झोपडपट्ट्यांच्या वाढत्या संख्येमुळे हे मृत्यू झाले असावेत. पर्यावरणवादी आणि वन्यजीव कार्यकर्ते पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी वन अधिकारी आणि शहरी विकासक यांच्यात समन्वित प्रयत्नांच्या तातडीच्या गरजेवर भर देतात. तात्काळ हस्तक्षेपाशिवाय खारघरच्या नाजूक परिसंस्थेत सोनेरी कोल्हे आणि इतर वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आहे, याकडेही ते लक्ष वेधतात.