Tinder Love Scam: प्रेम मिळवण्यासाठी 'टिंडर'वर गेली महिला; गमावून बसली आयुष्यभराची सर्व कमाई, जाणून घ्या नक्की काय घडले
तो फिलाडेल्फियामध्ये राहतो आणि त्याला एक मुलगी आहे. मात्र, तरुण तिला कधीच प्रत्यक्ष भेटला नाही आणि व्हिडिओ कॉलवरही स्वतःचा चेहरा दाखवला नाही. दोघांमध्ये फक्त टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून संवाद व्हायचा.
बदलत्या काळात लोक सोशल मीडिया आणि डेटिंग अॅप्सवर (Dating Apps) नातेसंबंध शोधत आहेत. टिंडर (Tinder), हिंज, बंबल इत्यादी प्लॅटफॉर्मवर लाखो वापरकर्ते आहेत आणि सर्वजण रोमँटिक जोडीदाराच्या शोधात आहेत. मात्र सोशल मिडियावर प्रस्थापित झालेली फार कमी नाती दीर्घकाळ टिकतात. यातील बरीच नाते क्षणार्धात आनंदाचा आभास निर्माण करतात, परंतु पुढे ती मनावर खोल जखमा करून जातात. असाच काहीसा प्रकार एका 42 वर्षीय महिलेसोबत घडला आहे. टिंडरवर प्रेम शोधण्यासाठी गेलेल्या या महिलेचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. या महिलेने टिंडर डेटसाठी आपल्या आयुष्यभराची कमाई गमावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेबेका होलोवे नावाच्या या महिलेचा काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा घटस्फोट झाला होता. यानंतर तिला तिचे आयुष्य नव्याने सुरू करायचे होते. यासाठी तिने टिंडर अॅपची मदत घ्यायचे ठरवले. ही महिला दोन मुलांची आई आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा एका व्यक्तीने टिंडरवर तिच्यामध्ये स्वारस्य दाखवले तेव्हा तिला वाटले की, कदाचित या व्यक्तीच्या रूपाने तिला एक योग्य जीवनसाथी मिळू शकतो. रेबेकाला ती व्यक्ती आवडली व त्यांच्यामध्ये बोलणे सुरु झाले.
तरुणाने रेबेकाला सांगितले की, तो एक फ्रेंच व्यापारी असून त्याचे नाव फ्रेड आहे. तो फिलाडेल्फियामध्ये राहतो आणि त्याला एक मुलगी आहे. मात्र, तरुण तिला कधीच प्रत्यक्ष भेटला नाही आणि व्हिडिओ कॉलवरही स्वतःचा चेहरा दाखवला नाही. दोघांमध्ये फक्त टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून संवाद व्हायचा. या तरुणाशी बोलल्यानंतर रेबेकाला खूप बरे वाटायचे. जुने सर्व काही विसरून तिने नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवायला सुरुवात केली होती. फ्रेडच्या बोलण्यामधून तिला असे वाटत होते की, आपल्याला आपला योग्य माणूस सापडला आहे. थोडक्यात ती फ्रेडवर प्रेम करू लागली होती.
अनेक दिवस बोलल्यानंतर फ्रेडने रेबेकाशी क्रिप्टोकरन्सी आणि गुंतवणूक याबाबत चर्चा करायला सुरुवात केली. एके दिवशी, गप्पांमध्ये त्याने रेबेकाला क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर तिने फ्रेडने सांगितलेल्या बनावट क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मवर एक हजार डॉलर्सची गुंतवणूक केली. यामुळे तिला $168 चा नफा मिळाला. सुरुवातीला रेबेका या प्लॅटफॉर्मवरून तिची कमाई तिच्या बँक खात्यात ट्रान्सफर करायची. त्यामुळे तिचा या व्यासपीठावर आणि फ्रेडवरचा विश्वास वाढला. (हेही वाचा: AI सोबत संबंध म्हणजे प्रत्यक्षात साथीदारासोबत चिटिंग ? पहा UK तील विवाहितांमधील सर्व्हे काय अहवाल देतोय!)
नंतर तिने $6,000 ची गुंतवणूक केली आणि नफा मिळवला. त्यानंतर ती वरचेवर गुंतवणूक करत राहिली. त्यानंतर तिने आपल्या आयुष्यातील सर्व बचत, साधारण 3 कोटी 29 लाख रुपये या प्लॅटफॉर्मवर गुंतवली मात्र त्यानंतर तिला तिच्या खात्यात एक पैसाही ट्रान्सफर करता आला नाही. त्यानंतर फ्रेडसुद्धा रेबेकाच्या आयुष्यातून गायब झाला. जेव्हा रेबेकाने तिच्या मैत्रिणीला घडलेला प्रकार सांगितला तेव्हा अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली असून तिची फसवणूक झाल्याचे मैत्रिणीने रेबेकाच्या लक्षात आणून दिले.