Toxic Levels of Lead Found in Turmeric: भारतातील हळदीमध्ये शिशाची पातळी मर्यादेपेक्षा 200 पट अधिक; उद्भवू शकतात आरोग्याच्या गंभीर समस्या

मात्र 32% हळदीच्या नमुन्यांचे स्त्रोत माहित नव्हते. बिहारच्या संदर्भात, अहवालात असे म्हटले आहे की उच्च शिसे असलेल्या हळदीचे नमुने प्रामुख्याने बिहारमध्येच समोर आले आहेत.

हळद ( फोटो सौजन्य - फेसबुक)

Toxic Levels of Lead Found in Turmeric: चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे, मात्र आजकाल अनेक गोष्टींमधील भेसळ आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करत आहे. आता हळदीमधील (Turmeric) भेसळीचे प्रकरण समोर आले आहे. हळद हा भारतीय स्वयंपाकघरातील खास मसाल्यांपैकी एक आहे आणि विशेष औषध म्हणूनची हळदीचा वापर होतो. हळदीबाबत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासाच्या अहवालात असे दिसून आले आहे की, त्यात 200 पट जास्त शिसे मिसळलेले असते ज्याची आपल्याला माहिती नसते आणि जे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवते.

हळदीसंदर्भात ‘सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्नमेंट’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात अलीकडेच हे सत्य समोर आले आहे. त्यानुसार भारतातील पाटणा आणि पाकिस्तानमधील कराची आणि पेशावर येथे उपलब्ध हळदीच्या नमुन्यांमध्ये शिशाची धोकादायक पातळी आढळून आली. हे शिसे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने निर्धारित केलेल्या 10 मायक्रोग्रॅम/ग्रॅमच्या मर्यादेपेक्षा 200 पट जास्त असल्याचे आढळून आले आहे आणि ते आरोग्यासाठी धोकादायक आहे.

गुवाहाटी आणि चेन्नई येथील हळदीच्या नमुन्यांमध्येही शिशाचे उच्च प्रमाण आढळून आले. हळदीमध्ये शिशासारखे 'लीड क्रोमेट' असते, जे पेंट, प्लास्टिक, रबर आणि सिरॅमिक कोटिंगमध्ये वापरले जाते. त्यामुळे जाणूनबुजून किंवा अजाणतेपणी आपण हळदीसोबत शिसे सेवन करत आहोत. शिशाच्या अतिसेवनामुळे मेंदू, हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होतात. यासोबतच हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो. तसेच थकवा, उच्च रक्तदाब आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. (हेही वाचा: Mumbai Healthcare Facilities: मुंबईत मधुमेह सर्वात प्राणघातक आजार, सार्वजनिक दवाखान्यांची कमतरता; Praja Foundation ने प्रसिद्ध केला शहरातील आरोग्य समस्यांवर प्रकाश टाकणारा धक्कादायक अहवाल)

संशोधन पेपरमध्ये असे म्हटले आहे की, भारतातील हळद प्रामुख्याने तामिळनाडू (22%) आणि महाराष्ट्रातून (14%) येते. मात्र 32% हळदीच्या नमुन्यांचे स्त्रोत माहित नव्हते. बिहारच्या संदर्भात, अहवालात असे म्हटले आहे की उच्च शिसे असलेल्या हळदीचे नमुने प्रामुख्याने बिहारमध्येच समोर आले आहेत. दरम्यान, शिसे मिश्रीत हळदीचे सेवन टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सेंद्रिय हळद निवडावी आणि ती घरीच बारीक करून वापरावी, यामुळे आरोग्याला धोका कमी होतो. हळदीची चाचणी घेणे महत्वाचे आहे, त्याशिवाय त्याच्या धोक्यांबद्दल जागरूक असणे खूप महत्वाचे आहे.