हवेतील कोरोना व्हायरसमुळे तब्बल 8 मीटर पर्यंतच्या व्यक्तीला होऊ शकते संक्रमण; MIT संशोधकांचा दावा

युरोपातील अनेक देशांसह अमेरिका, भारत या ठिकाणीही कोरोना व्हायरसच्या पेशंट्समध्ये वाढ होत आहे.

Migrant workers (Photo Credits: IANS)

जगभरात कोरोना व्हायरसची (Coronavirus) भीती दिवसेंदिवस वाढत आहेत. युरोपातील अनेक  देशांसह अमेरिका, भारत या ठिकाणीही कोरोना व्हायरसच्या पेशंट्समध्ये वाढ होत आहे. अशात अमेरिकन मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (MIT) ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये विषाणूच्या संक्रमणाबाबत माहिती दिली आहे. हवेत असलेला कोरोना व्हायरसचा विषाणू तब्बल 27 फुटांपर्यंतच्या (जवळजवळ 8 मीटर पेक्षा जास्त) व्यक्तीला संक्रमित करू शकतो, असे एमआयटीने म्हटले आहे. सध्या भारतातील लोकसंख्या आणि ज्याप्रकारे लोक गर्दीत राहतात हे पाहून या अहवालानुसार इतर लोक संक्रमित होण्याचा धोका आणखी  वाढला आहे.

या अमेरिकन संशोधकांच्या मते, जेव्हा कोरोना ग्रस्त व्यक्ती शिंकतो अथवा खोकतो तेव्हा, लाळेच्या थेंबांमध्ये असलेले विषाणू तोंडातून बाहेर येतात व ते तसेच हवेत राहतात. हे विषाणू 27 फूटांपर्यंत प्रवास करू शकतात. यामुळे असोसिएट प्रोफेसर लायडिया बॉउरोइबा यांनी सोशल डीस्टसिंग 2 फुटांपर्यंत वाढवण्याचे सुचविले आहे. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, या धोक्यापासून बचाव करण्यासाठी सर्जिकल मास्क आणि एन 95 मास्क किती प्रभावी आहेत याचा शोध आतापर्यंत लागला नाही. (हेही वाचा: Coronavirus च्या उपचारासाठी नव्या पद्धतीचा अवलंब; जुन्या पेशंट्सच्या रक्ताने नवीन रुग्णांवर होणार उपचार)

संशोधकांचे म्हणणे आहे की, जर वातावरण जर का गरम असेल किंवा तापमान जास्त असेल तर व्हायरसचे संक्रमण थांबू शकेल. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, जेव्हा कोरोना व्हायरसची लागण झालेली व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा त्याच्या थुंकीचे अगदी बारीक कण हवेमध्ये पसरतात व याच कणांमधून संसर्ग पसरतो. जेव्हा एखादी व्यक्ती शिंकते किंवा थुंकते तेव्हा 3,000 हून अधिक कण तोंडाबाहेर पडतात जे 27 फुटांपर्यंतच्या व्यक्तीला धोकादायक ठरू शकते. याआधी एमआयटीच्या संशोधकांनी भारतातील उन्हामुळे या विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर होणार नाही असे सांगितले होते. आता या नवीन अभ्यासामुळे लोक अजून दक्ष झाले आहेत.