IPL Auction 2025 Live

Omicron Scare: Pulse Oximeter ते Sanitizer Spray कोरोनाच्या पुन्हा गडद होणार्‍या सावटादरम्यान सुरक्षित राहण्यासाठी घरात ठेवाच या अत्यावश्यक गोष्टी!

रोजा धडकी भरवणारी रूग्णसंख्या समोर येत असल्याने कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी चिंता करत बसण्यासाठी स्वयंशिस्त लावून घ्या.

Stay Home Stay Safe | Pixabay.com

महाराष्ट्रासह जगातच ओमिक्रॉन (Omicron) हा नवा कोविड 19 व्हेरिएंट धुमाकूळ घालत आहे. ओमिक्रॉन झपाट्याने पसरत असल्याने आता सर्वत्रच कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. दिलासादायक बाब म्हणजे सध्या कोरोना रूग्ण वाढत असले तरीही अद्याप बहुसंख्य रूग्ण हे असिम्प्टमेटीक आहेत. त्यामुळे शक्य आहेत तिथे रूग्ण होम क्वारंटीन केले जात आहेत. अजूनही राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर झालेला नाही त्यामुळे अनेकांची कामानिमित्त घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी ये-जा सुरूच आहे. पण याचमध्ये कळत-नकळत कोरोनाची लागण होऊ शकत असल्याने आता प्रत्येकाने सजग असणं आवश्यक आहे.

ओमिक्रॉन सौम्य असल्याने त्याच्याप्रति हलगर्जी करण्यापेक्षा नियमित तुमच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणं गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी घरच्या घरी तुमच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी काही वैद्यकीय उपकरणं तुम्हांला मदत करू शकतात त्यामुळे या ठिकाणी घरी ठेवाच.

पल्स ऑक्सिमीटर

कोरोना संकटामध्ये रक्तातील ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर मदत करत आहे. सामान्यतः निरोगी व्यक्तीच्या रक्तात ऑक्सिजनची पातळी 95 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान असते. 95 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजनची पातळी फुफ्फुसांच्या काही प्रकारच्या समस्या दर्शवते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की 92 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजनची पातळी एखाद्या व्यक्तीमध्ये गंभीर आरोग्याचे प्रश्न निर्माण करू शकते. नक्की वाचा: Pulse Oximeter: जाणून घ्या घरी ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी 'पल्स ऑक्सिमीटर'चा वापर नक्की कसा करावा, तसेच त्याचे फायदे, किंमत आणि कुठे विकत घ्याल.

थर्मामीटर

कोरोना संसर्गानंतर ताप येणं हे प्रमुख लक्षण आहे त्यामुळे नियमित तुमच्या शरीराच्या तापमानावर लक्ष ठेवा. शरीराचं तापमान 37.8 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींना अलगीकरणात राहण्याचा सल्ला आहे. कोरोना संकटामध्ये कॉन्टॅक्ट लेस ताप मोजण्यासाठी खास थर्मल गन देखील उपलब्ध आहे. ती देखील जवळ ठेवा.

सॅनिटायझर स्प्रे

कोरोना वायरसला दूर ठेवण्यासाठी स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरात वारंवार हाताळल्या जाणार्‍या जागांवर सॅनिटायझर स्प्रे मारून ती जागा स्वच्छ आणि सुरक्षित ठेवा. घरात एखादी व्यक्ती होम क्वारंटीन असेल तर हा स्प्रे फायद्याचा आहे कारण त्यानंतर पुन्हा कापडाने किंवा पाण्याने ती जागा स्वच्छ करावी लागत नाही.

ऑक्सिजन काँसंट्रेटर

घरात खूप वयोवृद्ध किंवा सहव्याधी, गंभीर आजार असणारी व्यक्ती असल्यास ऑक्सिजन काँसंट्रेटर ठेवा. अचानक ऑक्सिजनची कमरता जाणावल्यास त्याची मदत होऊ शकते. खोलीतल्या हवेत, ऑक्सिजन काँसंट्रेशन चे प्रमाण 93 % किंवा त्यापेक्षा कमी असेल तर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज असते. तसेच ऑक्सिजन पातळी 90 पेक्षा खाली गेल्यास, आजाराचे स्वरूप गंभीर असल्याचे गृहीत धरत रुग्णाला अति दक्षता विभागात दाखल करावे लागते. नक्की वाचा: Oxygen Concentrators नेमकं काम कसं करतं? कोविड 19 रूग्ण त्याचा वापर कसा, कधी करू शकतो?

ग्लोव्ह्स

कोरोना वायरस हा छुपा शत्रू आहे. त्याचा नाक, डोळे, तोंड यांच्याद्वारे शरीरात प्रवेश होऊ शकतो त्यामुळे हा धोका कमी करण्यासाठी ग्लोव्ह्स मदत करू शकतात. हातात ग्लोव्ह्स असल्यास सतत तोंडाला हात लावण्याचं प्रमाण कमी होऊ शकत

मास्क

सर्जिकल मास्क किंवा एन 95 मास्क यांचा घरात थोडा स्टॉक ठेवा. सध्या कोरोनाची लस घेतली असली तरीही कोविड 19 चा संसर्ग होत आहे. त्यामुळे कापडी मास्क घालत असल्यास डबल मास्क घालून घराबाहेर पडा. घरात रूग्ण असल्यास किंवा कोविड 1 रिपोर्टची वाट पाहत असल्यास घरातही मास्क घालून राहणं हितावह आहे. Covid 19 चा संसर्ग टाळण्यासाठी वापरलेले मास्क Disinfect कसे कराल? जाणून घ्या मास्क स्वच्छ करण्याची योग्य पद्धत.

युव्ही सॅनिटायझर

कोरोना वायरसचा घरातील वावर कमी करण्यासाठी बाहेरून आल्यानंतर सार्‍या गोष्टी सॅनिटाईज करा. प्रामुख्याने घड्याल, व्हॉलेट, अंगावरील दागिने, पैसे सॅनिटाईज करण्यासाठी युव्ही सॅनिटायझर घरात ठेवा. ऑनलाईन किंवा ऑफलाईन देखील तुम्हांला तो सहज मिळू शकतो.

ग्लूकोमीटर

ग्लूकोमीटर मधुमेहींसाठी अत्यावश्यक आहे. वेळोवेळी रक्तातील साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यासाठी ग्लूकोमीटर द्वारा लक्ष ठेवा. अचानक रक्तातील साखर वाढल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

भारतामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रवेश झाल्यानंतर मागील महिन्याभरात रूग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. रोजा धडकी भरवणारी रूग्णसंख्या समोर येत असल्याने कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी चिंता करत बसण्यासाठी स्वयंशिस्त लावून घ्या. आयत्या वेळेस धावाधाव टाळण्यासाठी तुमची नेहमीची औषधं वेळीच घरात आणून ठेवा. अगदीच संपेपर्यंत वाट पाहू नका. दरम्यान वरील सुचवलेले पर्याय तुम्हांला केवळ सुरक्षित राहण्यासाठी मदत करू शकतात. तो वैद्यकीय उपचारांना पर्याय असू शकत नाही त्यामुळे कोरोनाची लक्षण आढळल्यास किंवा निदान झाल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.