Omicron New Variants: देशात दिवाळीनंतर येऊ शकते कोरोनाची नवी लाट; XBB व BF.7 व्हेरियंट्सनी वाढवली चिंता

दिवाळीनंतर काही दिवसांनी कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचेही गेल्या वर्षी दिसून आले होते.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसबाबत (Coronavirus) देशातील बहुतांश राज्यांमध्ये परिस्थिती सामान्य आहे. पण यादरम्यान, ओमिक्रॉनच्या (Omicron) दोन नवीन उप-प्रकारांनी चिंता वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी, देशात सब व्हेरिएंट XBB ची प्रकरणे नोंदवली गेली होती. हा प्रकार अनेक राज्यांमध्ये पसरत आहे आणि 50 हून अधिक प्रकरणांची पुष्टी झाली आहे. दरम्यान, देशात BF.7 सब-व्हेरियंटची पहिली केस देखील समोर आली आहे. गुजरात जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राने ही माहिती दिली आहे. भारतापूर्वी, हा सब व्हेरिएंट चीन आणि अमेरिकेत पसरत आहे.

देशात कोरोनाची दोन नवीन रूपे एकत्र येणे धोक्याचे लक्षण असू शकते. अहवाल सांगत आहेत की हे प्रकार अधिक संसर्गजन्य आहेत आणि लसीच्या प्रतिकारशक्तीला देखील बायपास करत आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, XBB प्रकार अधिक संसर्गजन्य आहेत. लोकांनी या सब व्हेरिएंटबाबत सावध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेषत: ज्यांना आधीच गंभीर आजार आहेत त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Omicron च्या XBB आणि BF.7 प्रकारांबाबत तज्ञांनीदेखील सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, हे दोन्ही प्रकार रोग प्रतिकारशक्ती कमी करून लोकांना पुन्हा संक्रमित करू शकतात. कोविड प्रतिबंधाबाबत खूप निष्काळजीपणा केला जात आहे. सध्या देशात दिवाळीचा सण येऊ घातला आहे. बाजारात पूर्वीसारखी गर्दी आणि वर्दळ वाढत आहेत. त्यात हे दोन व्हेरिएंट समोर आल्याने सणानंतर कोविडची प्रकरणे पुन्हा वाढू शकतात. या व्हेरिएंटपासून धोका आहे कारण ही रूपे लस घेतलेल्या लोकांना देखील पुन्हा संक्रमित करू शकतात.

रिपोर्ट्सनुसार, जर दोन्ही नवीन रूपे एकाच वेळी पसरू लागली तर थोड्याच वेळात मोठ्या लोकसंख्येला संसर्ग होऊ शकतो. सणांच्या या हंगामामध्ये एका संक्रमित व्यक्तीकडून अनेक लोकांमध्ये विषाणूचा प्रसार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. NTAGI चे अध्यक्ष डॉ एन के अरोरा म्हणतात की, सध्या पुढील 15 ते 20 दिवसांचा काळ खूप महत्त्वाचा आहे. सिंगापूरमध्ये, XBB प्रकारात एका महिन्यात 70 टक्के वाढ झाली आहे. यावरून हे दिसून येते की, हा प्रकार खूपच संसर्गजन्य आहे. अशा परिस्थितीत भारतातील लोकांनी गाफील राहिल्यास सणांनंतर कोविडची प्रकरणे पुन्हा वाढू शकतात. (हेही वाचा: दिलासादायक! 2030 पर्यंत येणार कर्करोगावर उपचार करण्यासाठी लस; BioNTech च्या संस्थापकांची माहिती)

याबाबत साथीचे रोगतज्ज्ञ डॉ जुगल किशोर सांगतात की, सण-उत्सवाच्या काळात नागरिकांनी निष्काळजीपणा केला तर कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू शकतात. दिवाळीनंतर काही दिवसांनी कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचेही गेल्या वर्षी दिसून आले होते. ओमिक्रॉनच्या कोणत्याही उप-प्रकारांमध्ये आतापर्यंत रूग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. या नवीन उप-प्रकारांबद्दल अद्याप फारशी माहिती नसली तरी, ते देखील पूर्वीच्या उप-प्रकारांसारखेच असतील अशी अपेक्षा आहे.