मुंबईच्या Glenmark Pharma ला मिळाली कोरोना व्हायरसच्या औषधांची चाचणी घेण्याची परवानगी; DCGI ने मंजुरी दिलेली भारतातील पहिली कंपनी

कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांच्या उपचारासाठी, फेवीपिरावीर अँटीव्हायरस टॅब्लेटच्या (Favipiravir Antiviral Tablets) क्लिनिकल चाचणीसाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून परवानगी मिळाली आहे

Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांच्या उपचारासाठी, फेवीपिरावीर अँटीव्हायरस टॅब्लेटच्या (Favipiravir Antiviral Tablets) क्लिनिकल चाचणीसाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सला (Glenmark Pharmaceuticals) ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून परवानगी मिळाली आहे. ग्लेनमार्क फार्मा यांनी असा दावा केला आहे की, डीसीजीआयकडून अशी मंजुरी मिळवणारी ही देशातील पहिली कंपनी आहे. फेवीपिरावीर एक अँटी-व्हायरल औषध आहे. या औषधाने इन्फ्लूएंझा व्हायरस विरूद्ध योग्य प्रतिसाद दर्शविला होता. क्लिनिकल चाचणीची परवानगी मिळाल्याची बातमी समजताच, गुरुवारी व्यापारा दरम्यान ग्लेनमार्कचे शेअर्स 9 टक्क्यांनी वधारले.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी या औषधासाठी कच्चा माल (एपीआय) तयार केला आहे, तसेच त्यांनी याचे फॉर्म्युलेशन देखील विकसित केले आहे. कंपनीने मानवी वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी मागितली होती. अंशतः संक्रमित रूग्णांच्या चाचणीसाठी ही मंजुरी कंपनीला देण्यात आली आहे. जपानमध्ये इन्फ्लूएन्झा व्हायरसच्या उपचारांसाठी या औषधाच्या वापरास परवानगी आहे.

नियमांनुसार, कंपनी कोरोना व्हायरसच्या अंशतः संक्रमित निवडलेल्या 150 रुग्णांवर याची चाचणी घेईल. रुग्णावरील चाचणीचा कालावधी 14 दिवसांपेक्षा जास्त असू शकत नाही. त्याच वेळी,  कंपनीच्या या संपूर्ण अभ्यासाचा कालावधी 28 दिवसांपेक्षा जास्त असू शकत नाही, असे सांगण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांत चीन, जपान आणि अमेरिकेत कोरोना विषाणूच्या रुग्णांवर अशा अनेक प्रयोगात्मक चाचण्या केल्या गेल्या आहेत.

कंपनीचे हे उत्पादन, जपानमधील फुजीफिल्म तोयमा केमिकल को. लि. च्या अविगन टॅब्लेटची (Avigan tablets) जनरिक आवृत्ती आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे कार्यकारी उपाध्यक्ष - Global R&D - सुश्रुत कुलकर्णी याबाबत बोलताना म्हणाले की, 'या क्लिनिकल चाचणीमुळे आपल्या लक्षात येईल की, हे औषध कोरोना व्हायरस रुग्णांवर कशा प्रकारे काम करेल अथवा त्याची कार्यक्षमता काय आहे. जर क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्या, तर फेवीपिरावीर हे कोरोना विषाणूवरील संभाव्य उपचार ठरू शकतो.'