Mpox Vaccine in India: सीरम इन्स्टिट्यूट स्वदेशी अँटी-एमपॉक्स लस विकसित करण्याबाबत आशावादी; Adar Poonawalla यांची माहिती
मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी भारतात 32 प्रयोगशाळा आहेत. डब्ल्यूएचओनुसार, 2022 पासून जगभरातील 116 देशांमध्ये मंकीपॉक्सची 99,176 प्रकरणे आणि 208 मृत्यूची नोंद झाली आहे.
Mpox Vaccine in India: जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स (Mpox) विषाणूची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. शेजारील देश पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 4 प्रकरणे समोर आली आहेत. आता कोरोना लस कोव्हिशिल्ड (Covishield) बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने मंकीपॉक्स लस तयार करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले, एमपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर, आम्ही लाखो लोकांना मदत करण्यासाठी एक लस विकसित करत आहोत. आशा आहे की, आम्ही ही लस एका वर्षात पूर्ण करू.
एमपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमध्ये 19 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने देशातील सर्व बंदरे आणि विमानतळांसह पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांना बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. सध्या भारतात मंकीपॉक्सची लागण कोणालाही झालेली नाही. शेवटचे प्रकरण मार्च 2024 मध्ये उघडकीस आले होते.
याआधी 19 ऑगस्ट रोजी, आरोग्य मंत्रालयाने दिल्लीतील केंद्राच्या तीन मोठ्या रुग्णालयांमध्ये- राम मनोहर लोहिया, सफदरजंग आणि लेडी हार्डिंग, नोडल केंद्रे तयार केली आहेत. एमपॉक्सच्या रुग्णांवर उपचार आणि काळजी घेण्यासाठी या रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. केंद्राने सर्व राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील रुग्णालयांमध्ये मंकीपॉक्स रुग्णांसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या मूल्यांकनानुसार मंकीपॉक्सचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याचा धोका कमी आहे. (हेही वाचा: What is Mpox? एमपॉक्स म्हणजे काय? लक्षणे, सद्यस्थिती आणि प्रतिबंधात्मक उपाय घ्या जाणून)
भारतामध्ये 2022 पासून मंकीपॉक्सची 30 प्रकरणे आढळून आली आहेत. मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी भारतात 32 प्रयोगशाळा आहेत. डब्ल्यूएचओनुसार, 2022 पासून जगभरातील 116 देशांमध्ये मंकीपॉक्सची 99,176 प्रकरणे आणि 208 मृत्यूची नोंद झाली आहे. यावर्षी आतापर्यंत 15,600 हून अधिक प्रकरणे आणि 537 मृत्यूची नोंद झाली आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार मंकीपॉक्सचा उगम आफ्रिकन देश काँगोमधून झाला आहे. त्यानंतर हा आजार शेजारील देशांमध्ये झपाट्याने पसरला. आफ्रिकेतील 10 देशांना याचा गंभीर फटका बसला आहे. कोरोनाप्रमाणेच तो प्रवासातून जगाच्या विविध भागात पसरत आहे.