HIV via Blood Transfusion: महाराष्ट्रात रक्ताद्वारे एचआयव्ही संक्रमणामध्ये तब्बल चार पट वाढ; पहा धक्कादायक आकडेवारी
ईश्वर गिलाडा म्हणाले की, सध्याच्या विकसित विज्ञानाच्या युगात रक्त संक्रमणाद्वारे एचआयव्ही संसर्ग होणे हा गुन्हा आहे. ते पुढे म्हणाले, दात्याच्या रक्तावर न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लिफिकेशन टेस्ट (Nucleic Acid Amplification Test- NAAT) करून दूषित रक्तातून एचआयव्ही प्रसारित होण्याची टक्केवारी आणि संभाव्यता काही प्रमाणात कमी केली जाऊ शकते.
महाराष्ट्रामध्ये 2021 ते 2022 पर्यंत रक्ताद्वारे एचआयव्ही (HIV) संक्रमित लोकांच्या संख्येत तब्बल चार पट वाढ झाली आहे. कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या (RTI) प्रश्नाला दिलेल्या उत्तरात ही बाब उघड झाली आहे. हा डेटा दोन्ही वर्षांतील जुलैपर्यंतच्या कालावधीशी संबंधित आहे. आकडेवारीनुसार, 2021 मध्ये 68 आणि 2020 मध्ये 49 लोकांच्या तुलनेत 2022 मध्ये राज्यातील 272 लोकांना रक्ताद्वारे एचआयव्हीची लागण झाली.
राज्यात 2017 ते 2022 (जुलैपर्यंत) एकूण 1,010 एचआयव्ही संसर्गाची नोंद झाली. तज्ञांनी सांगितले की यामध्ये मूलभूत समस्या ही आहे की, बहुतेक रक्तपेढ्यांमध्ये एचआयव्हीची चाचणी अजूनही एन्झाइम-लिंक्ड इम्यून-सॉर्बेंट परख चाचणी (ELISA) द्वारे केली जाते, ज्यामध्ये कमतरता आहे.
याबाबत डॉ. ईश्वर गिलाडा म्हणाले की, सध्याच्या विकसित विज्ञानाच्या युगात रक्त संक्रमणाद्वारे एचआयव्ही संसर्ग होणे हा गुन्हा आहे. ते पुढे म्हणाले, दात्याच्या रक्तावर न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लिफिकेशन टेस्ट (Nucleic Acid Amplification Test- NAAT) करून दूषित रक्तातून एचआयव्ही प्रसारित होण्याची टक्केवारी आणि संभाव्यता काही प्रमाणात कमी केली जाऊ शकते. अगदी तीन दिवसांपूर्वी दात्याला एचआयव्हीची लागण झाली असली तरीही या चाचणीद्वारे संसर्ग ओळखता येऊ शकतो.
डॉ गिलाडा पुढे म्हणाले की, NAAT चा वापर करून स्क्रीनिंग चाचण्यांचा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी सरकारला सातत्याने पाच किंवा अगदी 10 नमुन्यांची एकत्रित चाचणी घेण्यास सांगितले आहे. या चाचणीचा खर्च पारंपारिक ELISA किंवा EIA चाचण्यांपेक्षा कमी असेल. रक्तपेढ्यांनी अशा चाचणीचा वापर करावा असे त्यांनी सुचवले. (हेही वाचा: भारतात प्रिमॅच्युअर बाळ जन्माला येण्याची संख्या जास्त, अभ्यासातून आले समोर)
ते म्हणतात, ‘1989 मध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, असोसिएटेड लॅब्स, भारत सिरम्स आणि मुंबई व ठाण्यातील 15 रक्तपेढ्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात माझी फौजदारी रिट याचिका केल्यानंतरच महाराष्ट्रात रक्ताची सुरक्षा सुरू झाली. त्यावेळी, माझ्याद्वारे शेकडो व्यावसायिक रक्तदाते एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले होते. नऊ वर्षांच्या (कायदेशीर लढाईनंतर), सर्वोच्च न्यायालयाने 1998 मध्ये भारतातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये एचआयव्ही तपासणी अनिवार्य केली.’
याबाबत सरकारी रक्तपेढीत काम करणार्या एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले की, ‘रक्त संक्रमणाद्वारे एचआयव्हीचा प्रसार होणे हे भीषण वास्तव आहे. हे टाळण्यासाठी दोन गोष्टी अमलात आणता येतील- एक म्हणजे रक्तपेढ्यांनी NAAT सारखी उत्तम चाचणी अवलंबावी, दुसरे म्हणजे, दात्यांच्या पूर्वायुष्याचे योग्य विश्लेषण करणे आवश्यक आहे. यामध्ये अनेक सेक्स भागीदार किंवा सेक्स वर्कर्सशी झालेले शारीरिक संबंध, स्थानिक दुकानातून शरीरावर टॅटू काढणे इत्यादी प्रश्नांचा समावेश करावा.