Fight Against Covid-19 & Influenza H3N2: कोरोना व्हायरस आणि इन्फ्लूएंझा व्हायरस विरोधात लढण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन
जर एखाद्या व्यक्तीला फ्लूची लक्षणे दिसत असतील तर त्याने आपल्या आहारातही बदल करणं आवश्यक आहे. चला तर मग अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊया, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि संसर्ग किंवा विषाणूंविरुद्ध लढण्यास मदत करतील.
Fight Against Covid-19 & Influenza H3N2: देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरल डोकं वर काढत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ नोंदवण्यात येत आहे. अशातचं इन्फ्लूएंझा H3N2 विषाणूमुळेही देशातील चिंता वाढली आहे. या दोन्ही विषाणूमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन्ही विषाणूंची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. 129 दिवसांनंतर देशात एकाच दिवसात एक हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजारांच्या पुढे गेली आहे. त्याच वेळी, 2 जानेवारी ते 5 मार्च दरम्यान, H3N2 विषाणूची 451 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
तथापी, तज्ञ XBB व्हेरियंटच्या नवीन उप-प्रकार XBB 1.16 कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्याचं सांगित आहेत. त्याच वेळी, H3N2 विषाणूमध्ये वेगाने पसरण्याची शक्यताही तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. खोकला, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे, थकवा, नाक वाहणे, घशात कफ येणे ही सामान्य लक्षणे या दोन्हींमुळे बाधित रूग्णांमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे तपासणीशिवाय या विषाणूंची ओळख पटवणे कठीण झाले आहे. (हेही वाचा -Covid XBB 1.16 Symptoms: भारतात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ; जाणून घ्या काय आहेत XBB 1.16 व्हेरियंटची लक्षणे)
ICMR ने आपल्या अॅडव्हायजरीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, विषाणूपासून बचाव करण्यासाठी, साबण आणि पाण्याने हात धुवा, मास्क घाला आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. तसेच शिंकताना आणि खोकताना तोंड आणि नाक झाका. जर एखाद्या व्यक्तीला फ्लूची लक्षणे दिसत असतील तर त्याने आपल्या आहारातही बदल करावा. चला तर मग अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊया, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि संसर्ग किंवा विषाणूंविरुद्ध लढण्यास मदत करतील.
कोरोना व्हायरस आणि इन्फ्लूएंझा H3N2 विरुद्ध लढण्यासाठी या पदार्थांचे सेवन करा -
तुमच्या आहारात ताजी हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. कारण ते अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. फळे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. (वाचा - Influenza Illness Measures and Precautions: इन्फ्लूएंझा आजार टाळण्यासाठी काय खबरदारी घ्याल? आरोग्य विभागाने दिली प्राथमिक माहिती)
- व्हिटॅमिन ए - पपई, गाजर, रताळे, जर्दाळू
- व्हिटॅमिन डी - दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मशरूम, अंडी, मासे
- व्हिटॅमिन सी - लिंबू, आवळा, टोमॅटो, संत्री, गोड लिंबू यांसारखी सर्व लिंबूवर्गीय फळे
- व्हिटॅमिन ई - सूर्यफुलाच्या बिया, करडईच्या बिया, बदाम आणि पिस्ता
- झिंक आणि सेलेनियम - चिया बिया, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, संपूर्ण कडधान्ये, संपूर्ण धान्य, काळे तीळ, अंडी, मासे
प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा -
आपल्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा. प्रथिनांचे कार्य स्नायू तयार करणे, ऊतींना ताकद देणे आणि त्वरीत बरे होण्याच्या क्षमतेस प्रोत्साहन देणे आहे. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जसे की दही, पनीर व्यतिरिक्त, तुम्ही प्रथिनांसाठी तुमच्या आहारात सोया, डाळी, नट किंवा उकडलेले अंडे समाविष्ट करू शकता.
फ्लू आणि विषाणूजन्य आजारापासून वाचण्यासाठी औषधी वनस्पती -
घरामध्ये दररोज वापरल्या जाणार्या औषधी वनस्पती आणि मसाल्यांमध्ये दाहक-विरोधी, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. तुळशी, सुंठ, लेमनग्रास, लसूण, हळद, काळी मिरी, धणे, दालचिनी, हे असे काही मसाले आहेत, जे सेवन केल्याने तुम्ही आजारी पडण्यापासून वाचता.
प्रोबायोटिक्स असलेल्या पदार्थांचे सेवन करा -
आपल्या आहारात प्रोबायोटिक्स आणि प्री-बायोटिक्स समाविष्ट करा. दही, ताक, पनीर आणि इतर आंबवलेले पदार्थाचे सेवन केल्याने शरीराला प्रोबायोटिक्स मिळते. याचे सेवन केल्याने आतड्यांतील खराब बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत होते आणि तुम्ही आजारी पडण्यापासून वाचता.
ओमेगा -3 आणि ओमेगा -6
ओमेगा -3 आणि ओमेगा -6 समृद्ध असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा. यासाठी तुम्ही बदाम, अक्रोड, चिया सीड्स, फ्लेक्स सीड्स, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया खाऊ शकता. याशिवाय नारळपाणी, लिंबूपाणी, ताजे घरगुती सूप, ताक आणि ग्रीन टी यांसारखी पेये अधिक प्रमाणात सेवन करा.
डिस्क्लेमर: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आल्या आहेत. याला सल्ला समजू नका. वरील आहार फॉलो करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)