Breath Holding Exercise: फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी कसा कराल श्वास रोखून धरण्याचा व्यायाम? जाणून घ्या एक्सपर्ट सल्ला

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये प्राणवायू पुरवठ्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ.व्ही.के.पॉल यांच्या निरीक्षणानुसार, 'श्वास घेता न येणे' हे या लाटेमध्ये सर्वात सामायिक लक्षण आहे.

कॅन्सर (Photo Credit: Pixabay)

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये प्राणवायू पुरवठ्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ.व्ही.के.पॉल यांच्या निरीक्षणानुसार, 'श्वास घेता न येणे' हे या लाटेमध्ये सर्वात सामायिक लक्षण ठरले असून, त्याची परिणती प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणात वाढण्यामध्ये झाली आहे.  छाती शस्त्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष, मेदांताचे संस्थापक आणि लंग केअर फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त, डॉ.अरविंद कुमार सांगतात, "कोविड-19 च्या 90% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना काहीतरी झालेले असते पण ते क्लिनिकल दृष्टीने तितकेसे महत्त्वाचे नसते. 10% -12% व्यक्तींना न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसांचा संसर्ग होतो- यामध्ये फुफ्फुसांतील लहान लहान हवा पोकळ्यांना सूज येते. छोटे/अदीर्घ श्वास घेण्याची स्थिती जेव्हा आणखी तीव्र स्वरूप धारण करते तेव्हा, म्हणजे कोविड-19 रुग्णांपैकी अगदी कमी व्यक्तींना प्राणवायूच्या आधाराची गरज भासते.  श्वास रोखून धरण्याच्या व्यायामप्रकाराशी परिचय करून घ्या. रुग्णांची प्राणवायू गरज कमी करणारे आणि त्यांना स्वतःवर लक्ष ठेवण्यास प्रवृत्त करणारे हे तंत्र आहे (नक्की वाचा: Covid-19 ची नवी लक्षणे आली समोर; तोंड कोरडे पडत असेल किंवा खाज सुटत असेल तर चाचणी करून घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला.)

श्वास रोखून धरण्याच्या व्यायामाची कशी मदत होते

डॉ.अरविंद म्हणतात, "सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना हा व्यायाम अतिशय फायदेशीर आहे. या रुग्णांनी त्याचा सराव केल्यास, त्यांना प्राणवायू पुरवठा करावा लागण्याची शक्यता कमी होते. रुग्णाच्या स्थितीवर देखरेख करण्यासाठीही या व्यायामाचा उपयोग होऊ शकतो. श्वास रोखून धरण्याचा वेळ जर कमीकमी होऊ लागला तर, ही एक वेळेवर मिळालेली धोक्याची पूर्वसूचना असून रुग्णाने डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज असल्याचे लक्षात घेतले पाहिजे. तर, एखाद्या रुग्णाला श्वास रोखून धरण्याची आपली क्षमता वाढवत नेता आली, तर ते आशादायक चित्र होय. रुग्णालयात दाखल केलेले रुग्ण आणि प्राणवायू पुरवठा सुरु असलेले परंतु घरी पाठवलेले रुग्णही त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा सराव करू शकतात. त्यामुळे त्यांची प्राणवायूची गरज कमी होण्यास मदत होऊ शकेल. सर्वसामान्य व्यक्तीही श्वास रोखून धरण्याचा व्यायाम करू शकतात. यामुळे फुफ्फुसे सुदृढ ठेवण्यास मदत होईल.

 

श्वास रोखण्याचा व्यायाम कसा?

·       सरळ ताठ बसा आणि तुमचे हात मांड्यांवर ठेवा.

·       तोंड उघडून छाती भरेपर्यंत शक्य तितकी हवा तोंडावाटे आत घ्या

·       ओठ घट्ट मिटून घ्या.

·       तुम्हाला शक्य तेवढा वेळ श्वास रोखून धरा.

·       किती सेकंद तुम्ही श्वास रोखून धरू शकता, ते पाहा.

रुग्णांनी हे दर तासाने करून बघावयास हरकत नाही. श्वास रोखण्याचा कालावधी रुग्णांना सरावाने वाढविता येईल. 25 सेकंद किंवा त्यापेक्षा अधिक काळ श्वास रोखून धरू शकणारे रुग्ण सुरक्षित आहेत- त्यांच्या आरोग्याला धोका नाही, असे समजले जाते. मात्र असे करताना 'फार कठोरपणे प्रयत्न करून त्यानेच थकवा येणार नाही' याची काळजी घेतली पाहिजे.

संसर्गाचे लवकर निदान होणे महत्त्वाचे

कोविड- 19 चा सर्वाधिक परिणाम फुफ्फुसांवर होत असून, श्वास घेता ना येणे, किंवा प्राणवायूची रक्तातील पातळी खालावणे- हे प्रकार यामुळे होत आहेत. डॉ.अरविंद सांगतात, "पहिल्या लाटेच्या वेळी, ताप आणि खोकला ही सर्वसामान्य लक्षणे होती. दुसऱ्या लाटेच्या वेळी वेगळी लक्षणे दिसत आहेत जसे- घास खवखवणे, नाक वाहणे, डोळे लालसर होणे, डोकेदुखी, अंगदुखी, पुरळ, नॉशिया म्हणजे अन्नावरील वासना उडणे, उलट्या व जुलाब- आणि तीन-चार दिवसांनी रुग्णाला ताप येतो. त्यांनतर रुग्ण चाचणीसाठी जातो / जाते आणि त्यानंतर निकाल येऊन संसर्ग असल्याचे कळण्यास आणखी काही वेळ लागतो. म्हणजे, कोविड-19 असल्याचे नक्की समजेपर्यंत संसर्ग होऊन जवळपास पाच ते सहा दिवस उलटलेले असतात आणि काही व्यक्तींच्या बाबतीत, फुफ्फुसांवर परिणामही झालेला असतो."

कोविड-19 मुळे फुफ्फुसांवर परिणाम होणार की नाही, ते विविध घटकांवर अवलंबून असते- वय, वजन, फुफ्फुसांची सद्यस्थिती, मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयरोग, एच.आय.व्ही.संसर्ग, कमकुवत झालेली प्रतिकारशक्ती, धूम्रपानाच्या सवयी, कर्करोगावरील उपचारांचा पूर्वेतिहास व स्टिरॉईड्सचा वापर इत्यादी. असे मार्गदर्शनही डॉ.अरविंद करतात.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now