IPL Auction 2025 Live

हे १० सुपरफुड तुम्हाला नेहमी ठेवतील फिट; यांच्या सेवनाने विसरून जाल औषधांना

Photo Credit: Facebook

एका चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहारासोबतच काही अतिरिक्त घटकही तुमच्या शरीराला मिळणे आवश्यक आहे. अशा बाहेरून घेतलेल्या सप्लीमेंटमधून इतर अनेक पोषक मुल्ये तुमच्या शरीराला मिळत असतात. सध्या बाजारात प्रथिने, व्हिटॅमिन, कॅल्शियमयुक्त सर्व प्रकारची सप्लीमेंट मिळतात. मात्र विशेषज्ञांनुसार अशा पोषक घटकांसाठी सप्लीमेंटवर अवलंबून रहायची गरज नाही, आपल्या घरातच रोजच्या खाण्या पिण्याच्या गोष्टींमध्ये असे अनेक पदार्थ असतात जे आपल्या शरीरासाठी पोषक मूल्यांचे स्त्रोत ठरू शकतात.

चला तर पाहूया असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्यासाठी सप्लीमेंटचे कार्य करतील आणि प्रदान करतील इन्स्टंट एनर्जी.

१) बडीशेप – बडीशेपचा मुख्यतः मुखवास (माउथफ्रेशनर) म्हणून उपयोग होतो. पण कदाचित आपल्याला माहित नसेल बडीशेपमध्ये असलेले कॅल्शियम, सोडियम, आयर्न आणि पोटॅशियम हे आपल्याला थकवा देणाऱ्या हार्मोन्सना मारण्याचे कार्य करतात. शरीराला फ्रेश ठेवण्यासाठी योग्य प्रकारे चावून खाल्लेल्या बडीशेपचा अथवा बडीशेपच्या चहाचा फार उपयोग होतो.

२) दही - दही आरोग्यासाठीही पौष्टीक तसेच पचायलाही सोपे असते. दह्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियममुळे हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते. खाल्लेल्या अन्नाचे योग्यरितीने पचन होण्यासाठी दही उपयुक्त असते. दह्यातील घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. हवामानबदलामुळे जिवाणू आणि विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र आहारात दह्याचा समावेश केल्यास हा संसर्ग होण्यापासून आपला बचाव होतो.

३) आवळा – आवळ्याला व्हिटॅमिन सीचे खूप चांगले स्त्रोत मानले जाते. यामध्ये संत्री आणि लिंबूपेक्षा खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. याचसोबत आवळ्यामध्ये डायटरी फायबर, फॉस्फरस, आयर्न आणि कॅल्शियम आढळते. आवळ्याच्या सेवनाने डोळ्यांच्या समस्याही कमी होतात. सर्दी आणि खोकल्याच्या समस्येवरही आवळा गुणकारी ठरू शकतो. प्रामुख्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याची फार मदत होते.

४) केळे – शरीरातील तणाव कमी करण्यास केळ्याचा खूपच फायदा होतो. दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील ९० मिनिटांपर्यंत उर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते. यात पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, व्हिटामिन ए, बी, बी६, आर्यन, कॅल्शियम अशा पोषक तत्वांचा फार मोठा साठ असतो, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे.

५) ओट्स – ओट्स हे हेल्थी फूड या सदरात मोडत असल्याने ओट्स हा प्रथिनांचा खूप चांगला स्त्रोत मानला जातो. सकाळी नाश्त्याला ओट्स खाल्ल्याने दिवसभर आपल्याला एनर्जी मिळत राहते. जिमला जाणाऱ्या लोकांसाठी ओट्स हे अतिशय चांगले प्री वर्कआउट ठरू शकते.

६) अंडी - आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

७) पपई - पपईमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर त्यापासून लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते. वयानुसार दृष्टी कमी होण्याची समस्या उद्भवू नये यासाठी पपई खाणे फायदेशीर ठरते. पपई खाल्ल्यास पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. दिवसभराच्या धावपळीने आपल्याला बऱ्याचदा थकल्यासारखे जाणवते. अशावेळी वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास आलेला शीण कमी होण्यास मदत होते.

८) संत्री – संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे संत्री हे एक स्फूर्तीदायक फळ मानले जाते. संत्र्याचे नियमित सेवन केल्याने मूळव्याधाची समस्या दूर होते. रक्तस्राव थांबवण्याची क्षमता यामध्ये आहे. ताप असेल तर रुग्णाला संत्र्याचा रस दिल्याने तापमान कमी होते. तसेच यात असलेले सायट्रिक आम्ल हे मूत्र रोग आणि किडनीच्या आजारांना दूर करते.

९) अक्रोड – अक्रोडमध्ये असणाऱ्या ओमेगा 3 फॅटी एसिडमुळे तणाव तत्काळ कमी होतो. अक्रोडमुळे डिप्रेशन आणि चिंता कमी होण्यास मदत मिळते. अक्रोडमुळे व्यायामानंतरचा थकवा क्षणार्धात नाहीसा होतो.

१०) आले - आल्यामध्ये अनेक पोषक तत्व असून ते आरोग्यवर्धक आहे. आले वेदनाशामक, तापमान कमी करणारे आहे. आले पाचक, सारक व भूक वाढविणारे आहे. पित्ताने चक्कर आली वा मळमळत असेल, शस्त्रक्रियेनंतर उलटीसारखे वाटत असेल तर आल्याचा रस साखर व मिठाबरोबर घेतल्याने फायदा होतो.