Navratri 2019: भारतातील एकमेव मंदिर, जिथे साजरा होतो योनीरुपातील देवीच्या मासिक पाळीचा उत्सव; जाणून घ्या या शक्तीपीठाबद्दल आश्चर्यकारक माहिती
भारतात देवीची 51 शक्तिपीठे आहेत. यामध्ये आसाम राज्यातील कामाख्या मंदिर (Kamakhya Temple) हे मोठे जागृत देवस्थान मानले जाते.
गणपती उत्सवानंतर आता धामधूम सुरु झाली आहे ती नवरात्रीची (Navratri 2019), 29 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांचा जागर केला जातो. भारताला स्त्री देवतांची फार मोठी परंपरा लाभली आहे त्यामुळे हा देवीचा उत्सव सर्वत्रच साजरा केला जातो. नऊ दिवसांत देवीच्या विविध जागृत ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर पूजा-अर्चना होते. भारतात देवीची 51 शक्तिपीठे (51 Shakti Pithas) आहेत. यामध्ये आसाम राज्यातील कामाख्या मंदिर (Kamakhya Temple) हे मोठे जागृत देवस्थान मानले जाते. महत्वाचे म्हणजे भारतीय समाज जिथे स्त्रियांचा प्रायव्हेट पार्ट किंवा पाळी या विषयावर बोलणे टाळले जाते, तिथे या मंदिरात देवीच्या योनीची आणि मासिक पाळीचा उत्सव साजरा केला जातो.
सती देवीने स्वत्याग केल्यानंतर भगवान शंकर क्रोधीत झाले. रागाने त्यांनी तांडव नृत्य करायला सुरवात केली. हे पाहून भगवान विष्णू यांनी सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले व हे तुकडे भारतवर्षात विविध ठिकाणी पडले. हे 51 तुकडे ज्या ठिकाणी पडले त्यांना शक्तिपीठे म्हणतात. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. गुवाहाटी पासून 8 किमी दूर कामागिरी किंवा नीलाचल पर्वतावर सतीचा योनी भाग पडला. तिथे आज हे कामाख्या मंदिर उभे आहे. तांत्रिकांची देवी कामख्या देवीची पूजा, भगवान शिवची नववधू म्हणून केली जाते, जी मुक्ति प्रदान करते. कामाख्या माता काली आणि त्रिपुरा सुंदरी देवी नंतर तांत्रिकांची सर्वात महत्वाची देवता आहे.
मंदिराच्या गर्भगृहात कोणतीही मूर्ती स्थापित केलेली नाही. त्याऐवजी मधोमध छेद असलेला सपाट दगड देवीच्या योनीचे प्रतिनिधित्व करतो. स्त्रीच्या योनीला जीवनाचे प्रवेशद्वार मानले जाते, यामुळेच कामाख्याला सर्व सृष्टीचे केंद्र मानले जाते. स्त्रीची मासिक पाळी ही भारतभर अपवित्र मानली जाते. या काळात मुलींना बर्याचदा अस्पृश्य समजले जाते, मात्र कामाख्याच्या बाबतीत असे नाही. दरवर्षी अंबुबाची मेळ्यात (Ambubachi Mela) जवळच्या ब्रह्मपुत्र नदीचे पाणी तीन दिवस लाल होते. पाण्याचा लाल रंग हा कामाख्या देवीच्या मासिक पाळीमुळे होतो. तीन दिवसानंतर मंदिरात भाविकांची गर्दी जमते, प्रसाद म्हणून सर्वजण देवीचे लाल वस्त्र घेतात. हा लाल रंग देवीला वाहिलेल्या कुंकवामुळे प्रदान होतो. (हेही वाचा: Navratri 2019: नवरात्रात देवीला वाहा या नऊ फुलांच्या माळा; जाणून घ्या प्रत्येकाचे रंग)
बकरी, म्हशींचे बळी देणे येथे सामान्य गोष्ट आहे. तथापि मादी जनावरांचे बलिदान पूर्णपणे निषिद्ध आहे. याशिवाय कन्या पूजा व भंडारामार्फत कामाख्या मातेची पूजा केली जाते. मुख्य मंदिर कामाख्या मातेला समर्पित आहे, तेथे दहा महाविद्यांना समर्पित मंदिरे देखील आहेत. या महाविद्या - मातंगी, कमला, भैरवी, काली, धुमावती, त्रिपुरा सुंदरी, तारा, बागुलमुखी, चिन्नमस्ता आणि भुवनेश्वरी आहेत. तंत्र स्थान आणि काळी विद्या यासाठी हे स्थान आणखी महत्त्वपूर्ण समजले जाते. तर अशा या नवरात्रीत कामाख्या देवीच्या मंदिरातही उत्सव साजरा केला जातो.
मात्र कामाख्या देवी आणि तिची पूजा हे भारतीय संस्कृतीची तफावत दर्शवते. एकीकडे मासिक पाळीबद्दल समाजामध्ये उघडपणे बोलले जात नाही तर दुसरीकडे एका देवीचा मासिक पाळी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.