Rishi Panchami 2022: गणेश चतुर्थीच्या दुसर्या दिवशी ऋषिपंचमी व्रत करण्यामागील जाणून घ्या महत्त्व!
महिला हे ऋषिपंचमीचं व्रत करतात. या दिवशी बैलांच्या श्रमातून निर्माण झालेले पदार्थ न खाता दिवसभर व्रत पाळण्याचा नियम असतो.
गणेशोत्सवामध्ये भाद्रपद शुक्ल पंचमीचा दिवस हा ऋषिपंचमी (Rishi Panchami) म्हणून साजरा केला जातो. यंदा ऋषिपंचमी 1 सप्टेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. महिला हे ऋषिपंचमीचं व्रत करतात. या दिवशी बैलांच्या श्रमातून निर्माण झालेले पदार्थ न खाता दिवसभर व्रत पाळण्याचा नियम असतो. या व्रतामध्ये सात ऋषी आणि अरुंधती ची पूजा करण्याच्या उद्देशामागे ऋषींचे कार्य समजून घेऊन त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याची रीत आहे.
ऋषिपंचमी व्रताची कहाणी कथा व्रतराज ग्रंथात सांगण्यात आली आहे. हे व्रत केल्याने सुख-शांती प्राप्त होते. तसेच हातून नकळत घडलेली पापे नष्ट होतात असे सांगण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. नक्की वाचा: Ganeshotsav 2022 Dates: हरतालिका, ज्येष्ठा गौरी पूजन ते अनंत चतुर्दशी यंदा गणेशोत्सवातील पहा महत्त्वाच्या सणांच्या तारखा!
गौतम धर्मसूत्रात सांगितल्यानुसार, उपवास हा पापक्षालनाचा एक मार्ग आहे असे. उपवास ही धार्मिक आहारातील शिस्त आहे. उपवासाने जप, तप, ध्यान, इत्यादी गोष्टीना तेज येते असेही सांगितले जाते. त्यामुळे ऋषिपंचमीच्या व्रतादिवशी महिला बैलाच्या मेहनतीशिवाय तयार झालेल्या धान्य, भाज्यांचं सेवन करून हे व्रत पाळतात. ऋषिपंचमीला अळूच्या भाजीसह एक मिश्र भाजी केली जाते. नक्की वाचा: गणेशोत्सव विशेष : कशी बनवाल ऋषीपंचमीची हेल्दी टेस्टी भाजी ?
ऋषिपंचमी दिवशी सकाळी आंघोळ करताना आघाडाच्या काड्या डोक्यावर ठेवून आंघोळ केली जाते. त्यानंतर पाटावर तांदळाच्या आठ मुठी आणि आठ सुपार्या कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अरुंधती यांच्या पूजेसाठी मांडल्या जातात.
टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील गोष्टींची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. आमचा अंधश्रद्धा पसवण्याचा कोणताही हेतू नाही.