Republic Day 2023 Maharashtra Tableau: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथातून होणार साडेतीन शक्तिपिठांचे दर्शन, जाणून घ्या सविस्तर
Maharashtra Tableau 2023 For Republic Day: यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी ‘साडेतीन शक्तिपीठे व स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत.
Maharashtra Tableau 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2023) नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ (Republic Day Maharashtra Tableau 2023) सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ चित्ररथ साकारण्याचे काम दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरु आहे.
यावर्षीच्या चित्ररथ संकल्पनेत ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ यांची निवड करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते. पथसंचलनात सहभागी होणारे राज्य आणि मंत्रालये आपापल्यापरीने उत्तमोत्तम संकल्पना निवडतात आणि कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देऊन, हुबेहूब साकारून पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात.
महाराष्ट्राचा चित्ररथ 2023 पहा ट्विट
प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर 'साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती' महाराष्ट्राचा चित्ररथ.#RepublicDay pic.twitter.com/dcuQ8G6t7W
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) January 22, 2023
यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी ‘साडेतीन शक्तिपीठे व स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन यावेळी सर्व देशवासियांना घरबसल्या होणार आहे. (हेही वाचा: भारतात प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? भारताचे संविधान लागू झाले त्या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या)
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा चित्ररथ साकारण्यासाठी मूर्तिकार आणि कलाकारांना संधी दिली आहे. यावर्षीची संकल्पना, रेखाचित्रे व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. त्यांच्यासोबत ‘शुभ एड’ चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळत आहेत. 30 जणांचा समावेश असलेल्या, युवक मूर्तिकार आणि कलाकारांच्या टीमला घेऊन राहुल धनसरे मेहनत घेऊन 26 जानेवारीपर्यंत महाराष्ट्राचा चित्ररथ परिपूर्ण करण्याचे काम करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2023 12:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

