Ramadan Moon Sighting 2020: केरळ व कर्नाटक येथे दिसला 'चाँद'; उद्यापासून सुरु होणार पवित्र रमजानचा महिना
इस्लाममध्ये रमजानचा पाक महिना देवाची उपासना करण्यासाठी खूप महत्वाचा मानला आहे. आज संध्याकाळी भारताच्या केरळ राज्यातील कोझिकोडमधील कप्पड येथे चंद्र दिसला
इस्लामिक कॅलेंडरनुसार नवव्या महिन्याला महिना-ए-रमजान म्हणतात. इस्लाममध्ये रमजानचा (Ramadan) पाक महिना देवाची उपासना करण्यासाठी खूप महत्वाचा मानला आहे. आज संध्याकाळी भारताच्या केरळ राज्यातील कोझिकोडमधील कप्पड येथे चंद्र दिसला, त्यानुसार आता उद्यापासून रमजानचा पवित्र महिना सुरु होत आहे. या पवित्र महिन्यात इस्लामवर विश्वास ठेवणारे लोक नियमितपणे नमाज अदा करतात, संपूर्ण महिनाभर रोजा म्हणजेच उपवास ठेवतात व रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘ईद’ साजरी केली जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक ठिकाणी मस्जिदमध्ये सामुहिक नमाज होणार नाही.
केरळनंतर कर्नाटकमध्ये उडुपी आणि दक्षिण कर्नाटक येथे चंद्राचे दर्शन घडले, त्यानुसार आता भारतात उद्यापासून रोजे सुरु होतील. रमजानचा महिना हा इस्लाममधील सर्वात पवित्र महिना असून, मुस्लिम बांधवांसाठी फार मोठा सण आहे. या महिन्यात अल्लाहच्या केलेल्या प्रार्थनेचे फळ हे दुपटीने मिळते असे म्हणतात, म्हणून प्रार्थना, रोजे, नमाज अशा धार्मिक वातावरणात हा महिना व्यतीत करावा असे सांगितले गेले आहे. रमजान शब्दाची निर्मिती ‘रम्ज’ या शब्दापासून झालेली आहे. खरीप हंगामात पडणाऱ्या पावसास रम्ज म्हणतात.
या महिन्याची एक रात्र हजार महिन्यांहून अधिक श्रेष्ठ मानली जाते. रमजानच्या महिन्यात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही न खाता पिता अल्लाहची इबादत म्हणून रोज उपवास केला जातो. चाँद दिसल्यानंतर संध्याकाळी इफ्तार केले जातो. खजूर, सुकामेवा, शेवया, दूध यांबरोबरच चिकन, अंडी यांसारखे पदार्थ या काळात प्रामुख्याने खाल्ले जातात. रमजानच्या महिन्यामध्ये जकात देणे, कुरान वाचणे, नमाज पढणे अशी कामे करून अल्लाहला प्रसन्न केले जाते. या महिन्यात जास्तीत जास्त सत्कृत्य करावे असे सांगितले आहे. (हेही वाचा: Ramzan Mubarak 2020 Wishes & Greetings: रमजान उल करीम उत्सवाला लवकरच होणार सुरुवात; WhatsApp Status, HD Images आणि Stickers च्या माध्यमातून सर्वांना द्या या खास शुभेच्छा)
अशाप्रकारे हा अत्यंत पवित्र, समाजाचे कल्याण करणारा, सहसंवेदना जागवणारा, सुख-शांती-समाधानाचा संदेश देणारा, वाईट कर्मांपासून दूर ठेवणारा, दानधर्माचे महत्त्व अधोरेखित करणारा रमझानचा महिना आणि ईद-उल-फित्रचा सण आहे. मात्र यंदाच्या रमजानवर कोरोना व्हायरसचे सावट आहे. भारतात लॉक डाऊनमुळे मस्जिद बंद आहेत, त्यामुळे सामुहीज नमाज पठणही होणार नाही.