Margashirsha Guruvar Vrat 2024 Dates: 2 डिसेंबर पासून मार्गशीर्ष मासारंभ; पहा यंदा गुरूवार व्रताच्या तारखा काय?
या दिवशी घटाच्या रूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते.
महाराष्ट्रामध्ये श्रावणाप्रमाणेच मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्याचं विशेष महत्त्व आहे. महालक्ष्मी मातेच्या व्रतासाठी या महिन्यात दर गुरूवारी खास व्रत (Margashirsha Guruvar Vrat) वैकल्यं केली जातात. गुरूवारी घरा घरात घट मांडून तिची महालक्ष्मीच्या रूपात पूजा केली जाते. यंदा मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे तर या महिन्यात 4 मार्गशीर्ष गुरूवार साजरे केले जाणार आहेत. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरूवारी सवाष्ण महिला या व्रताचं उद्यापन करतात. या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून महिलांना, मुलींना, कुमारिकांना भेटवस्तू दिली जाते. मग जाणून घ्या यंदाच्या मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताच्या तारखा काय?
मार्गशीर्ष गुरूवार 2024 तारखा
मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात यंदा 2 डिसेंबर पासून सुरूवात होणार आहे. यामध्ये महालक्ष्मी व्रतासाठीचा पहिला गुरूवार 5 डिसेंबर, दुसरा गुरूवार 12 डिसेंबर, तिसरा गुरूवार 19 डिसेंबर, चौथा गुरूवार 26 डिसेंबर दिवशी आहे. तर मार्गशीर्ष महिन्याची सांगता 30 डिसेंबरला होणार आहे. 26 डिसेंबरला व्रताची सांगता होणार आहे. या दिवशी हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा विधी, नियम व वैभवलक्ष्मी घट मांडणी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती .
मार्गशीर्ष महिन्यात गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत करणार्या महिला एक दिवसाचा उपवास करतात. या दिवशी घटाच्या रूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते. सकाळ-संध्याकाळ त्याची पूजा केली जाते. देवीला खीर किंवा गोडाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच मार्गशीर्ष महिन्यात काही घरांत मांसाहार देखील टाळला जातो.