Jyotirao Phule Death Anniversary: भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुले यांचा आज स्मृतीदिन; जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य
त्यांनी जाती प्रथा, ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व, स्त्रियांचे शोषण, शेतकरी-कष्टकरी यांची पिळवणूक, सांस्कृतिक गुलामगिरी या सर्व आघाड्यांवर संघर्ष केला. अशा या जोतीराव गोविंदराव फुले यांची आज पुण्यतिथी.
महाराष्ट्राला अनेक समाजसुधारक, तत्ववेत्ते, विचारवंत लाभले. यामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या महात्मा ज्योतिबा फुले (Jyotirao Phule) यांचे योगदान फार मोलाचे आहे. त्यांनी जाती प्रथा, ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व, स्त्रियांचे शोषण, शेतकरी-कष्टकरी यांची पिळवणूक, सांस्कृतिक गुलामगिरी या सर्व आघाड्यांवर संघर्ष केला. अशा या जोतीराव गोविंदराव फुले यांची आज पुण्यतिथी. जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. इथेच 11 एप्रिल 1827 रोजी त्यांचा जन्म झाला. स्त्रिया, दलित, कष्टकरी आणि शेतकरी यांच्यासाठी आपले जीवन व्यतीत केलेल्या महात्मा फुलेंचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुण्यात झाला.
जोतीराव 9 महिन्यांचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. पुढे 13 व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला. सुरुवातीला घर चालवण्यासाठी त्यांनी काही व्यवसाय केले मात्र मुळातच बुद्धी तल्लख असल्याने त्यांचे व्यवसायात मन रमेना. म्हणूनच 1842 मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यानंतर 1848 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरु केली. बहुजन समाजाला, अस्पृश्यांना आणि त्यातही प्रामुख्याने स्त्रियांना शिक्षण द्यावे असा आग्रह त्यांनी केला. पुढे 4 मार्च 1851 रोजी पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा तर रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरु करण्यात आली.
फुलेंच्या या कार्याला त्या काळी सनातनी लोकांचा फार विरोध झाला. त्यावेळी त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई यांना स्वतः शिक्षण देऊन इतरांना शिक्षण देण्यास प्रवृत्त केले. हे कार्य इथेच थांबले नाही तर 1853 साली अस्पृश्यांसाठीही शिक्षणाची कवाडे खुली करण्यात आली. थॉमस पेन यांचे मानवी हक्कांवरील एक पुस्तक त्यांच्या वाचनात आले होते. या पुस्तकाचा त्यांच्या विचारंवर फार मोठा परिणाम झाला. याच विचारातातून बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, रात्र शाळा, पहिला पुनर्विवाह, स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करुन देणे, सत्यशोधक समाजाची स्थापना, व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना, अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा अशी अनेक महान कार्ये त्यांच्या हस्ते घडली. म्हणूनच 1888 साली मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली. (हेही वाचा: Savitribai Phule 122nd Death Anniversary: 'ज्ञानज्योती' म्हणजे सावित्रीबाई फुले)
समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. शाहू महाराजांनीही सत्यशोधक चळवळीस पाठींबा दिला. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. अशाप्रकारे आजचा हा आधुनिक भारत घडवण्यात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व सत्यशोधक चळवळीचा फार महत्वाचा वाटा आहे.