Ganeshotsav 2019: घरीच बनवा Eco Friendly Ganpati ; जाणून घ्या खास पद्धत (व्हिडिओ)
पर्यावरणपूरक गणपती बनविण्यासाठी काय करावे वैगेरे. आज आम्ही येथे एक व्हिडिओ आणि काही माहिती शेअर करत आहोत. जी तुम्हाला इकोफ्रेंडली गणपती कसा बनवायचा याबाबत मार्गदर्शन करु शकेल.
Eco Friendly Ganeshotsav 2019: पर्यावरणस्नेही गणपती, इको फ्रेंडली गणपती ( Eco Friendly Ganpati) वैगेरे शब्द आपण अनेक वेळा ऐकतो. गणपती उत्सवाच्या काळात तर या शब्दांचा जणू काही पाऊसच पडतो. गणपती उत्सव काळात होणारे प्रदूषण पाहून इको फ्रेंडली (Eco Friendly) गणपती उत्सव साजरा करण्याची भावना उचल खाते. पण, ती केवळ गणपती उत्सव काळातच. पुढे एकदा का गणपती बाप्पांचे विसर्जन झाले. सगळे काही संपते, ना कुणाला ना पर्यावरण आठवत ना इको फ्रेंडली गणपती. तो विचार पुन्हा ध्यानात येण्यासाठी चक्क पुढचे वर्षच उजाडावे लागते. मग पुन्हा सुरु होतो शोध. इको फ्रेंडली गणपती कसे बनवावेत. पर्यावरणपूरक गणपती बनविण्यासाठी काय करावे वैगेरे. आज आम्ही येथे एक व्हिडिओ आणि काही माहिती शेअर करत आहोत. जी तुम्हाला इकोफ्रेंडली गणपती कसा बनवायचा याबाबत मार्गदर्शन करु शकेल.
घरीच गणपती बनविण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य
पेपरमेशी माती -प्रमाण एक किलो (ही माती स्टेशनरी दुकानात मिळेल)
पाणी - आवश्यकतेनुसार
इतर साहित्य - ब्रश, चाकू, बोर्ड आणि पॉलिथिन.
गणपती मूर्ती बनविण्याची कृती
एक पॉलिथिन पेपर बोर्डवर चिटकवा. तो घट्ट चिटकला आहे याची पूर्ण काळजी घ्या. त्यानंतर पेपरमेशी माती त्या बोर्डवर घ्या. त्यात पाणी घालून ती मळायला सुरुवात करा. सुरुवातीला ही माती तुमच्या हाताला चिटकेल. परंतू, चिवटपणे हे कार्य सुरुच ठेवा. अखेर माती इतकी मळली जाईल की ती तुमच्या हाताला चिकटने बंद होईल. तुम्ही मळत असलेली माती हाताला चिकटायची बंद झाल्यावरही काही काळ माती मळा. जर तुमच्याकडे पावडर माती असल्यास ती माती गोंद किंवा फेविकॉलच्या मदतीने माती मळा. या मातीचे तीन समान भाग होईल असे तीन गोळे करा. या तीन गोळ्यांपैकी एका गोळ्याचे दोन भाग करा. या दोन भागापैकी (ज्या गोळ्याचे दोन भाग केले त्या गोळ्यापैकी) एका गोळ्याचा बेस तयार करायचा आहे. या बेसवरच बाप्पा विराजमान होणार आहेत.
गणपती प्रत्यक्ष साकारताना
बाप्पासाठी मातीचा बेस तयार करताना आगोदर मातीला लाडूसारखा आकार द्या. नंतर त्या लाडूला हलक्या हाताने दाब देत त्याचा बेस बनवून घ्या. गणपती मूर्तीसाठी बेसची जाडी साधारण 0.5 मि.मी आणि पूर्ण गोळ्याची रुंदी अंदाजे 10 ते 12 सें.मी. इतकी असावी. आता मातीच्या गोळ्याचा दुसरा भाग घ्या त्याला ओव्हल शेप द्या. ज्यामुळे गणपतीचे पोट तयार होईल. तुमच्या पहिल्या भागाचे काम पूर्ण झाले.
आता दुसरा मोठा गोळा घ्या. त्याचे चार भाग करा. या भागातून गणपती बाप्पांचे हात, पाय तयार करता येतील. त्यासाठी मातीच्या या चारही भागांना पाईपचा आकार द्या. हे मातीचे पाईप एका बाजूने पातळ करा. हे मातीचे पाईप साधारण 7 ते 8 सें.मी. असती याची काळजी घ्या.आता हे चारही पाईप बरोबर मध्य भगातून मोडा. त्यांना इंग्रजी V आकार द्या. तुमचे महत्त्वाचे काम झाले आहे. तुमच्या गणपती बाप्पांचे पोट, दोन्ही हात आणि दोन्ही पाय तयार झालेले आहेत. हे भाग बेसवर योग्य पद्धतीने लाऊन घ्या. (हेही वाचा, Ganesh Chaturthi 2019 Muhurat : गणेशाची पूजा कशी केली जाते, याची माहिती आहे का? मग जाणून घ्या गणेशोत्सवातील पूजा, महूर्त आणि महत्व)
गणपती मूर्ती अशी बनवा (व्हिडिओ)
प्रत्यक्षात मूर्ती साकारा
सुरुवातीला तयार केलेला बेस बोर्डच्या मध्यभागी ठेवा. पायाचा भाग बेसला आलथी-पालथी अशा अवस्थेत बेसवर लाऊन घ्या. आता त्यावर ओव्हल गोळा पायाला जोडून घ्या. आता या ओव्हल गोळ्यवरील माती पाय आणि बेसला चाकूच्या सहाय्याने पसरवून लावा. आता मूर्तीला दोन्ही हात लावण्यासाठी त्यातून जाड असलेल्या बाजूने दोन लहान गोळे काढून खांदे म्हणून पोटाच्या सर्वात वरील बाजूला चिकटवा आणि हात खांद्याला जोडून द्या. हातांची लांबी मूर्तीच्या आकाराप्रमाणे राहील याची काळजी घ्या. गणपती बाप्पांचा उजवा हात जरा दुमडा आणि तो आशीर्वाद स्थितीत ठेवा. तर, दुसऱ्या हातात प्रसाद देता येईल अशापद्धतीने त्याला शेप द्या. त्यावर एक छोटा मोदक ठेवा.
गणपतीचे शीर तयार करा
आता तुम्ही सर्वात मोठे आणि महत्त्वाचे काम करता आहात. तुम्ही गणपतीचे शीर बनवत आहात. त्यासाठी राहीलेल्या मातीच्या गोळ्याचे म्हणजेच तिसऱ्या गोळ्याचे चार भाग करा. त्यातून थोडी माती घेऊन गणपतीची मान तयार करा आणि उर्वरीत मातीचे डोके बनवा. ही मान डोके आणि गणपतीचे पोट यादरम्यान जोडून घ्या. राहिलेल्या एका गोळ्याची सोंड बनवा. मातीच्या तिसऱ्या भागाचे दोन गोळे तयार करा. त्यातून बाप्पांचे दोन कान तयार करा. त्यासाठी मातीच्या गोळ्याला पोळीसारखा आकार द्या आणि तो कापून कान बनवा. हे कान गणपतीच्या डोक्याला जोडा. राहिलेल्या गोळ्यातून गणपतीसाठी मुकुट किंवा पगडी तयार करा. आता चौथ्या आणि शेवटच्या गोळ्यातून गणपतीचे दात बनवा. लक्षात ठेवा गणपतीचा उजव्या बाजूचा दात पूर्ण असतो. तर, डाव्या बाजूचा दात हा लहान असतो.
गणपती विशेष व्हिडिओ
शेवटचे काम
तुमचे गणपती बाप्पा तयार झाले आहेत. आता केवळ त्यावर छान डोळे तयार करा आणि ब्रशने फिनिशींग करुन हवा तर त्याला हलका रंग द्या. अथवा, मूर्ती तशीच ठेवा. आणि हो आता जी माती शिल्लक आहे त्यापासून बाप्पांचे वाहन असलेले खास मूषकराज तयार करा. मूषक (उंदीर) तयार करण्यासाठी मातीचा गोळा करा. त्याचे तीन भाग करा. एका भागाला ओव्हल शेप द्या. त्यातून पोट बनवा. दुसऱ्या भागाचे तीन भाग करुन त्यातून डोकं, कान आणि शेपूट तया करा. तीसऱ्या भागाचे चार भाग करा त्यातून हात आणि पाय तयार करा. तुम्ही मुषकाच्या हातात लाकूड देऊ शकता. तर, मंडळी आता तुमचा इको फ्रेंडली गणपती तयार आहे.
वाट पाहा
तुम्ही बाप्पांची मूर्ती साकारली आहे. पण, ती मूर्ती सुकण्यासाठी आणि पूर्ण वाळण्यासाठी तीन ते चार दिवस लागणार आहेत. ही मूर्ती पूर्ण वाळल्यावर तुम्ही ती रंगवू शकता आणि तिची प्रतिष्ठापणाही करु शकता.