Diwali Faral: लाडूपासून चकलीपर्यंत हे फराळातील पदार्थ महाराष्ट्रात आले परप्रांतातून

चला तर थोडक्यात जाणून घेऊया, हे परप्रांतीय पदार्थ महाराष्ट्रात कधी आले आणि आपलेसे कसे झाले.

दिवाळी फराळ i प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Wikimedia Commons)

दिवाळी सणाला खरी रंगात येते ती दिव्यांच्या रोषणाईने तर कंदिलाच्या प्रकाशाने पण त्याचसोबत या सणाची गोडी वाढवतो तो घराघरात बनणारा फराळ. अगदी लाड़ूपासून, चकल्या, शेव, कारंजी असे विविध पदार्थांचा आस्वाद दिवाळी सणात घेतला जातो. परंतु तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की यातील अनेक पदरात हे मराठमोळे नसून परप्रांतीय आहेत. चला तर थोडक्यात जाणून घेऊया, हे परप्रांतीय पदार्थ महाराष्ट्रात कधी आले आणि आपलेसे कसे झाले.

लाडूंचा संपूर्ण प्रवास: औषध ते मिठाई

साधारण ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात रुग्णांना औषध म्हणून मध व गूळ यांच्यासह तीळ खाण्यास देत. आणि या सर्व मिश्रणाचे प्रमाण योग्य असावे यासाठी ते सर्व एकत्र करून विशिष्ट मात्रेत गोलाकारात वळलेले असत. जसजसा काळ बदलत गेला तसतसे यात बेसन, रवा असे अन्य घटक देखील वापरण्यात येऊ लागले.

चकलीचं दक्षिण भारताशी कनेक्शन

लालूच नाही तर आपल्या मराठी खाद्यसंस्कृतीत चकली ही देखील खूप प्रसिद्ध आहे. चकलीला चकुली, चकरी, मुरुक्कू या नावाने देखील ओळखले जाते. पण हीच चकली महाराष्ट्रात आली कुठून तर दक्षिण भारतातून. उपनिषद काळात 'चक्रिका' अशा एका पदार्थाचा उल्लेख आहे तर तमिळ भाषेत मुरुक्कू म्हणजे वेटोळी. भारतातच नाही तर श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया या देशातही चकली आढळते. कालांतराने तामिळ मुरुक्कुचं रूपांतर चकरीत झालं आणि त्याचा मराठी अपभ्रंश चकली असा झाला.

करंजीचं उत्तरभारताशी नातं

शुभशकुन मानली जाणारी फराळातील करंजी ही प्राचीन काळात शष्कुली या नावाने ओळखली जायची. करंजीचं मूळ उत्तरप्रदेशात दिसून येतं आणि मग उत्तरप्रदेश- राजस्थान - गुजरात - महाराष्ट्र असा प्रवास करत ती मराठमोळी झाली असावी. इतकाच नाही तर प्रत्येक प्रांतात करंजीला एक वेगळं नाव दिलं आहे. उत्तरप्रदेशात ती गुजिया म्हणून ओळखली जाते तर छत्तीसगडमध्ये कुसली, बिहारमध्ये पुरुकीया किंवा पेडकीया तर गुजराथमध्ये घुघरा.