Diwali 2021 Calendar With Dates in India: यंदा दिवाळीत धनतेरस, लक्ष्मी पूजन ते भाऊबीज कधी? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

जाणून घ्या दिवाळीच्या सणात यंदा वसूबारस(Vasubaras) , धनत्रयोदशी(Dhanatrayodashi) , लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan), दिवाळी पाडवा (Diwali Padwa) , भाऊबीज (Bhaubeej) कधी आहे?

Diwali | File Image

भारतीयांसाठी दिवाळी (Diwali) हा एक महत्त्वाचा सण आहे. दिवाळीच्या निमित्ताने घराघरामध्ये आनंदाचं, चैतन्याचं वातावरण असतं. सध्या भारतामध्ये कोरोनाचा विळखा कमी होत असल्याने आता अनेकांमध्ये मोकळ्या वातावरणामध्ये हा सण साजरा करण्याचा उत्साह आहे. मग जाणून घ्या दिवाळीचा सण यंदा नेमका कधीपासून कधी आहे. दिवाळीच्या सणामध्ये वसूबारस(Vasubaras) , धनत्रयोदशी(Dhanatrayodashi) , लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan), दिवाळी पाडवा (Diwali Padwa) , भाऊबीज (Bhaubeej) हे सण साजरे केले जातात. या प्रत्येक सणाचं भारतात हिंदू धर्मियांसाठी विशेष महत्त्व आहे. मग पहा नेमका यंदा दिवाळीत कोणता सण कधी आहे?

दिवाळीच्या दिवसात घराला रोषणाई केली जाते. घराची साफसफाई केली जाते. दारासमोर रांगोळी काढली जाते. तर घरात गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. फराळ बनवला जातो. दिवाळीत फटाके फोडण्याची देखील प्रथा आहे. मग पहा या दिवाळसणातील महत्त्वाच्या दिवसांची धामधूम. नक्की वाचा: Karva Chauth 2021 Date: करवा चौथ यंदा कधी? जाणून घ्या काय आहेत चंद्रोदयाच्या वेळा, पूजा विधी.

वसूबारस

दिवाळीची सुरूवात वसुबारस पासून होते. यंदा वसुबारस 1 नोव्हेंबर दिवशी आहे. या दिवशी गाय-वासरूरूपी पशूधनाची पूजा केली जाते.

धनतेरस

धनतेरस किंवा धनत्रयोदशीचा सण हा यंदा 2 नोव्हेंबर दिवशी आहे. या दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरी ची पूजा केली जाते. सोबत धनसंपदा वाढावी म्हणून कुबेराची देखील पूजा करण्याची प्रथा आहे.

नरक चतुर्दशी

महाराष्ट्रात नरक चतुर्दशीचा सण हा मोठा महत्त्वाचा आहे. याच दिवशी पहिली आंघोळ किंवा अभ्यंग स्नान असते. पहाटे सूर्योदयापूर्वी उठून उटण्याने आंघोळ करून दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला जातो. यंदा नरक चतुर्दशी 4 नोव्हेंबर दिवशी आहे.

लक्ष्मी पूजन

लक्ष्मी पूजन देखील यंदा 4 नोव्हेंबर दिवशीच आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरातील सोन्या नाण्याची पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचा वास रहावा याकरिता पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाला तिन्ही सांजेला ही पूजा केली जाते. लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त यंदा संध्याकाळी 6.02 ते रात्री 8.34 आहे. तर अमावस्या पहाटे 6.03 ला सुरू होत आहे.

दिवाळी पाडवा

दिवाळी पाडवा यंदा 5 नोव्हेंबरला आहे. या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणून देखील संबोधले जाते. पती-पत्नीमधील स्नेह वाढावा म्हणून हा दिवस खास असतो.  या दिवशी या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीला कट करून जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. अशी आख्यायिका आहे.

भाऊबीज

दिवाळीची सांगता भाऊबीजेच्या सणाने केली जाते. यंदा भाऊबीज 6 नोव्हेंबरला आहे. भावा-बहिणीच्या नात्याला वृद्धींगत करणारा भाऊबीजेचा सण आहे.

यंदा दिवाळीत कोरोना संकट निवळळल्याने अनेक निर्बंधांमधून सरकारने सूट दिलेली असली तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लस घेऊनही मास्क वापरणं कायम ठेवणं आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे. फटाके उडवतानाही पुरेशी खबरदारी घेणं तुमच्या आणि समाजाच्या हिताचं आहे याचं भान ठेवा.