Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? जाणून घ्या काय आहे या दिवसाचे महत्त्व
हा दिवस ठरविण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या नियमाप्रमाणे दिवसाच्या पूर्वार्धात वैशाख शुक्ल तृतीया असेल तो दिवस अक्षय्य तृतीयेचा दिवस समजावा असे सांगण्यात आले आहे.
Significance Of Akshay Tritiya: वैशाख महिन्यातील शुक्ल तृतीयेला 'अक्षय्य तृतीया' (Akshaya Tritiya) हा सण येतो. हा दिवस ठरविण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या नियमाप्रमाणे दिवसाच्या पूर्वार्धात वैशाख शुक्ल तृतीया असेल तो दिवस अक्षय्य तृतीयेचा दिवस समजावा असे सांगण्यात आले आहे. या वर्षी मंगळवार, दि. 7 मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चंद्र रोहिणी नक्षत्रात असेल आणि जर त्या दिवशी बुधवार असेल तर तो योग महापुण्यकारक समजला जातो. या वर्षी या दिवशी बुधवार नसला तरी चंद्र रोहिणी नक्षत्रात आहे. या तृतीयेला 'अक्षय्य' म्हणतात कारण या दिवशी केलेल्या जप, होम, दान इत्यादी गोष्टी अक्षय फल देणाऱ्या होतात. म्हणूनच या दिवशी चांगले विचार करावेत, चांगले काम करावे, चांगले बोलावे म्हणजे तेही अक्षय होऊन जाते.
अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी, मौल्यवान वस्तू खरेदी, घर खरेदी केली जाते. महाराष्ट्रातील लोक या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानतात. तर उत्तर भारतातील लोक या दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला असे मानतात. शेतकरी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शेतीच्या कामास प्रारंभ करतात. देशावर या सणास 'आखेती' असे म्हणतात. (अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messenger, GIFs, SMS च्या माध्यमातून देण्यासाठी खास मराठमोळी ग्रिटिंग्स!)
काय आहे अक्षय्य तृतीयेमागची कथा?
शाकल नावाच्या नगरात धर्म नावाचा एक व्यापारी राहत होता. तो रोज देवाची पूजा करीत असे आणि नेहमी सत्य बोलत असे. एके दिवशी एका विद्वानाने त्याला अक्षय्य तृतीयेचे महत्त्व सांगितले. ते ऐकून घेऊन व्यापारी नदीकाठी गेला. तेथे स्नान केले आणि पितरांचे स्मरण केले. त्यानंतर घरी येऊन त्याने पाण्याने भरलेल्या मातीच्या भांड्याचे दान केले. अशा रितीने जलदानाचा उपक्रम त्याने चालूच ठेवला. वृद्धापकाळी भगवंताचे नामस्मरण करीत असतानाच त्याला मृत्यू आला. पुढच्या जन्मी त्याला राजपद मिळाले तरी त्याने दानधर्म चालूच ठेवला. त्यामुळे त्याला बरीच संपत्ती प्राप्त झाली. त्याचा खजिना कधीही रिकामा झाला नाही.
या कथेतून एकच बोध घ्यावयाचा आहे, की माणसाने दान करायला पाहिजे. दान म्हणजे डोनेशन नव्हे. डोनेशनमध्ये कोणी दिले आणि काय दिले ते जाहीर करता येते. परंतु, दान हे गुप्त ठेवायचे असते. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये असे जे म्हटले जाते ते अगदी खरे आहे. (अक्षय्य तृतीयेला का कराल सोन्याची खरेदी? जाणून घ्या यामागील ५ मुख्य कारणं)
दानामागचा उद्देश
समाजातील गरजू गरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, हा अक्षय्य तृतीयेच्या दान माहात्म्या मागचा उद्देश आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जलदान, ज्ञानदान, पुस्तकदान, श्रमदान, रक्तदान, अर्थदान, वस्त्रदान करावे. आधुनिक वैज्ञानिक काळात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नेत्रदान, देहदानाचा संकल्प करणेही महान पुण्यकारक ठरेल.