जाणून घ्या विराट कोहलीच्या टॅटूंंमागचे रहस्य; प्रत्येक टॅटूमागे दडला आहे गहन अर्थ
या कारकिर्दीत त्याने आपल्या अंगावर जवळजवळ दहा टॅटू काढले आहेत आणि त्या प्रत्येक टॅटूमागे काहीना काही कारण आहे
भारतीय क्रिकेट संघातील सर्वात आघाडीचा खेळाडू, वन डे आणि कसोटीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल, जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक विराट कोहली. क्रिकेटमध्ये जितके विराटने नाव कमावले तितकीच चर्चा त्याच्या लाइफस्टाइलची सुद्धा होत राहते. म्हणूनच सर्वात स्टाईलिश क्रिकेटवीरांमध्ये त्याची गणना केली जाते. विराटचे कपडे, त्याची हेअरस्टाईल, त्याची दाढी अशा प्रत्येक घटकाची सामान्यांना भुरळ पडलेली आहे. आता या घटकांमध्ये अजून एका गोष्टीची भर पडलेली आहे ती म्हणजे विराटचे टॅटू. नुकतेच विराटला मुंबईमध्ये आपल्या हातावर एक नवीन टॅटू काढून घेताना पहिले गेले.
विराटने क्रिकेट कारकिर्दीत दहा वर्षे पूर्ण केली. या कारकिर्दीत त्याने आपल्या अंगावर जवळजवळ दहा टॅटू काढले आहेत आणि त्या प्रत्येक टॅटूमागे काहीना काही कारण आहे, प्रत्येक टॅटूचे स्वतःचे असे एक खास वैशिष्ठ्य आहे. नॅशनल जिओग्राफिक चॅनेलने तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीत विराट कोहलीने या टॅटूंमागच रहस्य उलगडले आहे.
विराटच्या डाव्या हाताच्या खांद्यावर ‘गॉडस आय’ (देवाचे डोळे) गोंदवले आहे. वाईट आणि दुष्ट प्रवृत्तींवर नजर ठेवणे हा या टॅटूमागील उद्देश आहे. तसेच हे डोळे भविष्यातील येणाऱ्या संधींवरही हे डोळे लक्ष ठेऊन असतील.
विराटच्या डाव्या हातावर एका मठाचे चित्र आहे, जे शांति आणि शक्तीचे प्रतीक आहे.
उजव्या हातावर विराटने कैलास पर्वतावर ध्यानस्थ शंकराचे चित्र रेखाटले आहे. ज्यावरून तो शंकराचा भक्त असल्याचे प्रतीत होते.
विराट आपल्या आईवडिलांवर किती प्रेम करतो हे त्याच्या टॅटूंवरून दिसते. विराटने डाव्या हाताच्या मागच्या बाजूला आईचे सरोज हे नाव हिंदीत गोंदवून घेतले आहे. तर उजव्या हाताच्या मागच्या बाजूला वडील प्रेम यांचेही नाव त्याने गोंदवले आहे.
2008 मध्ये विराटने वन डे सामन्यात पदार्पण केले होते. भारताकडून वन डे सामन्यात पदार्पण करणारा तो 175 वा खेळाडू होता. या गोष्टीची आठवण म्हणून विराटने 175 हा नंबर टॅटूद्वारे गोंदवून घेतला आहे.
तीन वर्षांनंतर त्याने कसोटीत पदार्पण केले आणि तो 269 खेळाडू होता. त्याही आकड्याचा टॅटू विराटच्या शरीरावर दिसून येतो.
विराटच्या बायसेप्सवर समुराई योद्ध्याचे चित्र आहे. या जपानी योद्ध्याच्या हातात तलवार आहे. विराट या टॅटूला त्याचा गुडलक मानतो.
विराटच्या मनगटावर आदिवासी कलांचे चित्र रेखाटले आहे. हा विराटचा पहिला टॅटू होय. या टॅटूद्वारे विराटमध्ये असलेली आक्रमकता दिसून येते.
5 नोव्हेंबर ही विराटची जन्मतारीख. हा महिना वृश्चिक राशीचा समजला जात असल्याने विराटच्या उजव्या हातावर स्कॉर्पिओ असे इंग्रजीत लिहिले आहे.
तर अशाप्रकारे इतके टॅटू अंगावर असणारा विराट आता टॅटूसाठीही तरुणांचा रोलमॉडेल बनत आहे.