IPL Auction 2025 Live

Farmers Protest: प्रजासत्ताकदिनी दिल्लीत शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा निघणार का? आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

या रॅलीमुळे कोणालाही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. राजपथच्या परेडनंतरचं शेतकरी रॅली सुरु करतील.

Supreme Court of India | (Photo Credits: IANS)

Farmers Protest: कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. आज पुन्हा एकदा या विषयावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. प्रजासत्ताक दिनी (Republic Day) म्हणजेच 26 जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढण्याची घोषणा शेतकरी संघटनांनी केली असून यासाठी दिल्ली पोलिसांकडून परवानगी मागितली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची परवानगी मिळणार की, नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.

शेतकरी संघटनांनी घोषणा केली आहे की, दिल्लीतील रिंगरोडवर ट्रॅक्टर रॅली काढली जाईल. या रॅलीमुळे कोणालाही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. राजपथच्या परेडनंतरचं शेतकरी रॅली सुरु करतील. यावेळी शेतकरी ट्रॅक्टरद्वारे सुमारे 50 कि.मी. प्रवास करतील. दिल्ली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देत ही ट्रॅक्टर रॅली रद्द करण्याचे आवाहन केले आहे. (वाचा - Farmers Protest: दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक करण्यासह दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय, संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका)

दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून हजारो शेतकरी कृषी कायद्याचा निषेध करत आहेत. आतापर्यंत सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत. या चर्चेत अनेक विषयांवर सहमती झाली आहे. मात्र, आता हे तीनही कायदे मागे घेण्यावर शेतकरी संघटना ठाम आहेत. अशा परिस्थितीत या वादाचे निराकरण केव्हा आणि कसे होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

याशिवाय भारतीय किसान युनियन लोकशक्तीने यासंदर्भात योग्य निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्यामध्ये कृषी कायद्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेली समिती पुन्हा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी संघटनांच्या मते, या समितीतील सर्व सदस्य आधीचं कृषी कायद्यांचे समर्थक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत न्याय होणार नाही.