Surya Grahan 2019: 26 डिसेंबरला दक्षिण भारतातून दिसणार या वर्षातील शेवटचे दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण
यादिवशी केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातील काही शहरातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. तसेच उर्वरित भारतातून ते खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.
Surya Grahan 2019: येत्या 26 डिसेंबरला दक्षिण भारतातून या वर्षातील शेवटचे दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण (Bracelet Solar Eclipse 2019) दिसणार आहे. यादिवशी केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातील काही शहरातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. तसेच उर्वरित भारतातून ते खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. दक्षिण भारतासह आखाती देश तर आग्नेय आशियाई देशांमधूनही दिसणार आहे. हे सूर्यग्रहण सकाळी 8 ते 11 या वेळेत पाहता येणार आहे. हे वर्षांतील शेवटचे सूर्यग्रहण आहे. 2020 मध्ये 21 जूनला पुन्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. (हेही वाचा - Grahan 2019: नववर्षात कधी असेल सूर्य, चंद्र ग्रहण; जाणून घ्या)
जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो. तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळते. या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे दिसते. याला कंकाणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. 26 डिसेंबरला चंद्राच्या सावलीच्या जमिनीवरील मार्गाची रुंदी 164 किलोमीटर आहे. हा मार्ग केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधील काही भागांमधून जाणार आहे. कंकणाकृती सूर्यग्रहणाची सुरुवात कतार, सौदी अरेबिया, ओमान, भारत, सिंगापूर, मलेशिया, फिलिप्पीन, श्रीलंका, इंडोनेशिया या देशातील काही भागातून होईल.
हेही वाचा - Surya Grahan 2019 Live Streaming: खग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये लाईव्ह कसं आणि कुठे बघाल?
दक्षिण भारतात केरळ मधील कन्नूर, कसारगोड, थालसरी, पलक्कड तर कर्नाटकातील मंगलोर, म्हैसूर आणि तामिळनाडूतील कोईमतूर, इरोडे, करूर, दिंडीगुल, कोझीकोडे, उतकमंड, शिवगंगा, तिरुचिरापल्ली, पुडकोट्टाई येथून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून 60 ते 70 टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. तसेच विदर्भ आणि महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी 08.10 वाजेपासून 09.32 वाजेपर्यंत असेल. आकाशप्रेमींनी हे सूर्यग्रहण पाहताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.