Congress 85th Plenary Session: राहुल गांधींनी सांगितला लहाणपणीचा किस्सा; म्हणाले, आज 52 वर्ष झाले आमच्याकडे घर नाही
राहुल गांधी म्हणाले की, 52 वर्षांपासून त्यांच्याकडे स्वतःचे घरही नाही. आमच्या कुटुंबाचे घर अलाहाबादमध्ये आहे आणि तेही आमचे घर नाही.
Congress 85th Plenary Session: छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचे 85 वे अधिवेशन सुरू आहे. शनिवारी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी या कार्यक्रमात भावनिक भाषण केले. आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. राहुल गांधी म्हणाले की, 52 वर्षांपासून त्यांच्याकडे स्वतःचे घरही नाही. आमच्या कुटुंबाचे घर अलाहाबादमध्ये आहे आणि तेही आमचे घर नाही. घराशी माझं फार विचित्र नातं आहे. मी जिथे राहतो तिथे माझ्यासाठी घर नाही, म्हणून मी कन्याकुमारी सोडल्यावर माझी जबाबदारी काय आहे, असा प्रश्न मी स्वतःला विचारला. मी भारताला समजून घेण्यासाठी बाहेर पडलो आहे.
काँग्रेसच्या 85 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी अधिवेशनाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला. या भेटीत मी देशातील सर्व घटकांना भेटलो, भारत जोडो यात्रेतून मला खूप काही शिकायला मिळाले, असे ते म्हणाले. आज दुपारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणाने अधिवेशनाची सांगता होणार आहे. (हेही वाचा - Sonia Gandhi On Political Retirement: मी कधीही निवृत्त झाले नाही आणि कधी होणारही नाही; राजकारणातील निवृत्तीच्या बातम्यांदरम्यान सोनिया गांधींचे महत्त्वपूर्ण विधान)
भारत जोडो यात्रेचा अनुभव सांगताना राहुल गांधी म्हणाले, “मला वाटले की मी तंदुरुस्त आहे, 20-25 किमी चालेन, पण यात्रा सुरू होताच जुनी गुडघेदुखी परत आली आणि 10-15 दिवसातच माझा अहंकार निघून गेला. भारत माताने मला एक संदेश दिला की, जर तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीरला चालायला निघाले असाल तर तुमचा अहंकार मनातून काढून टाका, नाहीतर चालत जाऊ नका.
भाजपवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, आम्ही सत्याग्रही आहोत आणि भाजपही सत्याग्रही आहे. ते सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकतात. अदानी 106 वरून 2 वर कसे पोहोचले? मी एका उद्योगपतीविरोधात संसदेत मोर्चा उघडला. मी एक फोटो दाखवला ज्यामध्ये मोदीजी अदानीसोबत विमानात बसले आहेत. मी काय संबंध आहे, असे विचारल्यावर भाजप सरकारचे सर्व मंत्री अदानींना संरक्षण देऊ लागले. ज्या देशाने अदानी वर हल्ला केला तो देशद्रोही झाला आणि अदानी देशभक्त झाला. भाजप आणि संघ त्या व्यक्तीला संरक्षण का देत आहेत? हा प्रश्न आहे. या शेल कंपन्या हजारो कोटी रुपये भारतात पाठवत आहेत, कोणाकडे? कोणाचा पैसा यात गुंतला आहे. याचा तपास का होत नाही, जेपीसी का स्थापन होत नाही? असा प्रश्न यावेळी राहुल गांधी यांनी यावेळी केला.
यादरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, अदानीइतकी कोणत्याही उद्योगपतीला प्रमोशन मिळालेली नाही. लोकशाही आणि संविधान वाचवण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे, काँग्रेस म्हणजे देशभक्ती, त्याग, सेवा, समर्पण, निष्ठा, प्रेरणा, करुणा, न्याय, निर्भयता आणि शिस्त, असंही खर्गे यावेळी म्हणाले.