छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदासाठी भूपेश बघेल यांच्या नावाची घोषणा
उद्या श्याम कॉलेजच्या क्रिडांगणावर शपथविधी सोहळा पार पडेल असेही सांगण्यात आले आहे.
छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत टी.एस.सिंह देव, ताम्रध्वज साहू, भूपेश बघेल आणि चरणदास महंत ही नावे होती. यातही भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांचे नाव आघाडीवर होते. आता हा तिढाही सुटला असून छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदासाठी भूपेश बघेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या काल झालेल्या मॅरॅथॉन बैठकीनंतर आज (रविवार) ही औपचारीक घोषणा झाली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानीही बैठक पार पडली. तर काँग्रेसचे नेते पी. एल. पुनिया यांच्याबरोबर राहुल गांधी यांनी स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर भूपेश बघेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी सायंकाळी चारही दावेदारांसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करून या निवडीबाबत उत्सुकता वाढवली होती. दरम्यान ताम्रध्वज साहू यांनी 'मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार कधीच नव्हतो,' असे वक्तव्य केले होते. रायपुरमध्ये आज दुपारी नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली त्यात बघेल यांच्या नावाचा निर्णय झाला. उद्या श्याम कॉलेजच्या क्रिडांगणावर शपथविधी सोहळा पार पडेल असेही सांगण्यात आले आहे. (हेही वाचा : राजस्थानचे पायलट अशोक गेहलोत)
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवत एकहाती विजय मिळवला आहे. नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये 4 तर राहुल गांधी यांनी छत्तीसगडमध्ये 19 सभा घेतल्या होत्या.