राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी कराः कांग्रेस नेता मल्लिकार्जुन खर्गे
मोदींनी राफेल डील देशहितासाठी नाहीतर अंबानीच्या फायद्यासाठी केली आहे असे खर्गे म्हणाले
मुंबई: राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे त्यामुळेच सरकार राफेल विमानाची खरेदी किंमत जाहीर करत नाही. राफेल खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. राफेल विमान खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने आज महालक्ष्मी रेसकोर्स ते ऑगस्ट क्रांती मैदान असा भव्य मोर्चा काढला.
ऑगस्ट क्रांती मैदानात छोटेखानी सभेने या मोर्चाची सांगता झाली. यावेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
ते म्हणाले की, "ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणत मोदींनी गेल्या साडेचार वर्षात भरपूर खाल्ले असून आपल्या उद्योगपती मित्रांनाही खाऊ घातले आहे. मोदीजी मोठं-मोठ्या गोष्टी करतात पण देशात वाढणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल, राफेल विमान खरेदी व्यवहाराबद्दल, महिलांवरील अत्याचाराबद्दल, अल्पसंख्यांक आणि दलितांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल कधीही काहीच बोलत नाहीत. जे काही बोलतात ते लोकांचे मन विचलित करण्यासाठीचे नवीन नवीन जुमले असतात. राफेल घोटाळा हा या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे."
मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरंक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांना विचारायचे आहे की, "जर तुम्ही म्हणता की, राफेल विमान खरेदी व्यवहार पारदर्शक आहे, प्रामाणिकपणाने देशाच्या हितासाठी केलेला व्यवहार आहे, मग तुम्ही या खरेदी व्यवहाराचे मूल्य का सांगत नाहीत? आम्ही त्यांना संसदेत विचारले की, या राफेल विमान खरेदी व्यवहाराची खरी किंमत जाहीर करा पण ते करत नाहीत. काँग्रेस सरकारने एका राफेल विमानाची 560 कोटी रूपये ठरवली होती. पण भाजप सरकारने हीच विमाने प्रत्येकी 1650 कोटी रुपये दराने विकत घेतली. या खरेदीत 41,205 कोटी रुपये जास्त मोजले." ही विमाने मूळ किमतीपेक्षा तिप्पट दराने विकत घ्यायचे कारण काय? असा सवाल करून मोदी उद्योगपतींच्या हितासाठी देश चालवित आहेत, मोदींनी राफेल करार देशहितासाठी नाहीतर अंबानीच्या फायद्यासाठी केली आहे असे खर्गे म्हणाले.
यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. चव्हाण म्हणाले की, " राफेल विमान खरेदी घोटाळ्याची व्याप्ती दीड लाख कोटींची आहे. खरेदीत मोठा घोटाळा केला आहे. म्हणूनच सरकार राफेल खरेदीची किंमत जाहीर करत नाही. राफेल विमान खरेदीच्या घोटाळ्याविरोधात काँग्रेस पक्षाने महालक्ष्मी रेसकोर्स ते ऑगस्ट क्रांती मैदान असा मोर्चा काढला आहे. याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून महात्मा गांधींनी इंग्रज सरकारला चले जाव चा नारा दिला होता. आज याच मैदानावरून आम्ही भाजप सरकार चले जाव असा नारा देत आहोत. राफेल विमान घोटाळ्यातील पैसा या देशातील जनतेचा पैसा आहे. भाजप सरकार राफेल विमान खरेदी व्यवहाराबाबत, लोकसभेमध्ये खोटे बोलत आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखरच प्रामाणिक आहेत, त्यांचे सरकार जर खरोखरच प्रामाणिक आहे तर संयुक्त संसदीय समितीमार्फत या घोटाळ्याची चौकशी करावी. काँग्रेस पक्षाने या घोटाळ्याविरोधात आंदोलन तीव्र केले असून या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करून दोषींना शिक्षा होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.
ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनीही केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे मा. राज्यपालांची भेट घेऊन राफेल खरेदी व्यवहाराची संसदेच्या संयुक्त समिचीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.