Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Date: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तारीख जाहीर; 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात होणार मतदान; 24 ऑक्टोबरला मतमोजणी
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच टप्प्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार असून 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
Maharashtra Assembly Election 2019 Date: मुंबई मध्ये आज ( 21 सप्टेंबर) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Election 2019) ची तारीख जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच टप्प्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार असून 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. तर आजपासूनच महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.राज्यात एकूण 288 विधानसभा जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीत पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उमेदवारांना आपल्या गुन्हेगारीची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 28 लाखांपेक्षा अधिक खर्च करण्याची परवानगी नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
निवडणूक प्रक्रिया
दरम्यान, महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार निवडणूक प्रक्रियेत मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडेल.
महाराष्ट्रामध्ये सध्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा,शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि विरोधी पक्षात असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना-भाजप आणि मित्रपक्ष महायुतीच्या माध्यमातून तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या माध्यातून विधानसभा निवडणुकीस सामोरे जातील. आज शरद पवारांनी एनसीपीची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 5 जणांचा समावेश आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडी, एमआयएम हे स्वतंत्र लढणार आहेत. तर, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) हे महायुतीद्वारे लढणार आहेत. तर, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आपले पत्ते अद्याप उघड केले नाहीत.
महाराष्ट्रासोबतच हरियाणा राज्यात 90 जागांसाठीदेखील 21 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. मात्र अद्याप झारखंड राज्यासाठी 82 जागांवर निवडणुका अपेक्षित आहे. त्याची घोषणा आज करण्यात आलेली नाही.